ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना महामारी आणि कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे यंदा संसदेचे अधिवेशन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लिहिलेल्या पत्रानुसार सरकार जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करू शकते.
प्रल्हाद जोशी यांनी चौधरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संक्रमणाच्या बाबतीत हिवाळा फार महत्वाचा आहे. हिवाळ्यात सर्दी, तापाची लक्षणे दिसून येतात. या काळात विशेषतः दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले. आता आपण डिसेंबरच्या मध्यावर आहोत.
आपण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला आणि कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच हिवाळी अधिवेशन टाळण्याचा सल्ला दिला. सरकारला लवकरच संसदेच्या आगामी अधिवेशनाची बैठक बोलवायची आहे. कोरोना साथीमुळे उद्भवणारी अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाची बैठक बोलावणे उचित ठरेल, असे जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.