रात्री-अपरात्री ओल्या पाटर्य़ांना ऊत : परिसरातील रहिवाशांना समस्या : कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जाधवनगर परिसरातील एनसीसी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या खुल्या जागेचा दुरुपयोग होत आहे. या ठिकाणी रात्री-अपरात्री ओल्या पाटर्य़ा चालत असल्याने परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून अवैध प्रकारांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील खुल्या जागा व उद्याने शहरवासियांसाठी वरदान आहेत. काही ठिकाणी असलेल्या खुल्या जागा आणि उद्याने त्रासदायक ठरत आहेत. जाधवनगर येथील खुल्या जागेत कचरा टाकला जाते. त्याचप्रमाणे या जागेत रात्रीच्या वेळी अवैध प्रकार घडत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. या ठिकाणी काही युवक रात्रीच्या वेळी पाटर्य़ा करीत असून मद्यपान, धूम्रपान करून परिसरात मद्याच्या बाटल्या व इतर कचरा टाकत आहेत. हा परिसर सर्वसामान्य नागरिकांना खूपच धोकादायक बनला असून सायंकाळी सातनंतर घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे.
जागेभोवती संरक्षक भिंत उभारण्याची मागणी
खुल्या जागेचा दुरुपयोग होत असल्याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. पण याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही. अनेक वेळा निवेदन देऊन जागेभोवती संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. जागेचा उपयोग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण प्रशासनाने कानाडोळा केला असल्याने या जागेत अवैध प्रकार घडत असल्याची टीका रहिवासी करीत आहेत. येथील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









