शाहूनगर येथील घटना : पतीसह तिघा जणांविरुद्ध एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
शाहूनगर दुसऱया बसस्टॉपजवळ राहणाऱया एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या प्रकरणी पतीसह तिघा जणांविरुद्ध एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सुमा सुभाष पम्मार (वय 33) असे त्या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोरी कापून तिला वाचविण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, 5.50 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी सुमाच्या माहेरवासीयांनी पती सुभाष पम्मार, दीर कृष्णा पम्मार व कृष्णाची पत्नी शांता पम्मार या तिघा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भा.दं.वि. 498 (ए), 306 कलमांन्वये एफआयआर दाखल केला आहे. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ही घटना बुधवारी घडली असली तरी सुमाचे माहेरवासीय गुरुवारी बेळगावात दाखल झाले. त्यानंतर सुमाचे माहेर व सासरवासीयांत वादावादीची घटना घडली. सुमाने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमाला अंकुश व दर्शन अशी दोन मुले आहेत. चन्नापूर तांडा येथे तिचे माहेर आहे तर कलमड तांडा येथे सासर आहे. मात्र, सध्या ती आपल्या कुटुंबीयांसमवेत शाहूनगरला राहत होती. पती, दीर, भावजयीच्या जाचाला कंटाळून तिने आपले जीवन संपविले आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









