प्रतिनिधी/ बेळगाव
चव्हाट गल्ली शाळा क्रमांक 5 च्या जागेच्या विक्री प्रकरणी विविध गैरकारभार उजेडात आले आहेत. एडीएलआर आणि उपनोंदणी खात्याच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे जागेची विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱयांवर फौजदारी खटला दाखल करण्याची सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. तसेच कागदपत्रांमध्ये कोणताही फेरफार होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचा आदेश बजावला.
चव्हाट गल्ली मराठी शाळेच्या जागेची विक्री झाल्याने याबाबतची माहिती घेण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी महापालिका कार्यालयात विविध खात्याच्या अधिकाऱयांची बैठक शुक्रवारी बोलावली होती. अधिकाऱयांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. चव्हाट गल्ली शाळेच्या जागेवर मालकी हक्काचा दावा करून 2016 मध्ये जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न झाला होता. पण याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ताबा घेण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. चव्हाट गल्ली शाळेचे माजी विद्यार्थी, नागरिक आणि महापालिकेच्या प्रयत्नामुळे जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न फसला होता. पण सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असतानादेखील ताबा घेण्यास आलेल्या मोकाशी यांनी विनय माने नामक व्यक्तीला वटमुखत्यारपत्र देऊन जागेची विक्री केली असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
वटमुखत्यार विनय माने यांनी शाळेची जमीन शेती असल्याचे दाखवून 2 कोटी 70 लाख रुपयांना जयगौडा पाटील यांना विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच दिवशी काही तासाच्या अवधीनंतर सदर जागा बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीला आठ कोटी 70 लाख रुपयांना विकण्यात आल्याचे दस्त उपनोंदणी खात्याकडून उपलब्ध झाले आहे. पण खरेदी व्यवहार करताना सदर जागेचा फॉर्म क्रमांक 9 न घेताच या व्यवहाराची नोंद उपनोंदणी खात्याच्या अधिकाऱयांनी केली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा जाब उपनोंदणी खात्याच्या अधिकाऱयांना आमदार बेनके यांनी विचारला असता उपनोंदणी खात्याचे अधिकारी निरुत्तर झाले.
सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याचे सिटीसर्व्हे कार्यालयातील दप्तरात नोंद करण्यासाठी पत्र दिले असताना याची नोंद का झाली नाही? असा प्रश्न सिटीसर्व्हे कार्यालयातील अधिकाऱयांना विचारला असता याबाबत महापालिकेला नोटीस बजावली होती. पण ही नोटीस पोहोचली नसल्याने याची नोंद केली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. मूळात या जागेची विक्री करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची नोंद केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जागेच्या खरेदी-विक्री प्रकरणांमध्ये एडीएलआर आणि उपनोंदणी खात्याच्या अधिकाऱयांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आमदार बेनके यांनी केला.
काही तासाच्या अवधीतच दोन कोटी 70 लाखाचा खरेदीव्यवहार आठ कोटी चाळीस लाख रुपयांना होतो हा प्रकार म्हणजे निव्वळ गैरकारभार असल्याची प्रतिक्रिया बैठकीत उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थी संघटनेसह मनपाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली. हा गैरप्रकार करणाऱयांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना मनपा आयुक्त जगदीश के. एच. केली. तसेच एडीएलआर कार्यालयातील कर्मचाऱयांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सूचना केली. तसेच झालेला खरेदी व्यवहार न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश बजावला. महापालिकेच्या जागा बळकावण्याचा प्रयत्न करणा-यांना विरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱयांना कारागृहात डाबणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा इमारतीला कोणताही धोका पोहोचू नये याकरिता त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची सूचना केली. महापालिकेच्या खुल्या जागा हडप करणाऱयांविरोधात कठोर कारवाईची गरज आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सतर्क राहून कारवाईसाठी प्रयत्न करावा, अशी सूचना केली.
सदर जागेची विक्री एका सहकारी संस्थेला केली असून त्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जागा खरेदी बाबतचा ठराव करणे बंधनकारक आहे. तसेच या ठरावाची प्रत जागा खरेदी करताना कुपण नोंदणी खात्याने घेणे आवश्यक होते पण उपनोंदणी खात्याच्या अधिकाऱयांनी ठरावाची प्रत न घेताच हा व्यवहार केला असल्याची माहिती ऍड. प्रभू यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात सहकारी संस्थेच्या संचालकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. सहकारी संस्थेच्या विरोधात सहकारी संस्था नोंदणी खात्याकडे तक्रार करण्याची सूचना करण्यात आली. कारवाई तातडीने करून आठ दिवसात पुन्हा बैठक घेण्यात येणार असून त्यावेळी याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना आमदारांनी केली.
बैठकीवेळी ऍड. अमर येळ्ळूरकर, मनपा आयुक्त जगदीश के. एच., मनपाचे कायदा सल्लागार यु. डी. महातशेट्टी, जिल्हाशिक्षणाधिकारी, उपनोंदणी खात्याचे व एडीएलआर खात्याचे, महापालिकेचे अधिकारी व माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.









