युक्रेन-रशियातील तणावाचा प्रभाव कायम ः तिसऱया सत्रात घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात प्रामुख्याने जागतिक पातळीवर घडणाऱया घडामोडींचा प्रभाव हा भारतीय भांडवली बाजारावर झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने युक्रेन व रशिया यांच्यातील तणावपूर्ण निर्माण झालेल्या स्थितीमुळे भारतासह जगभरातील अनेक शेअर बाजारात नुकसानीचे वातावरण राहिले होते. याचा परिणाम म्हणून आठवडय़ाच्या अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय बाजारात सेन्सेक्स सलग तिसऱया सत्रात घसरणीसह बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्स जवळपास 59 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. तसेच पूर्व युरोपमधील राजकीय अस्थिर वातावरणाच्या प्रभावात रशियातील अन्य बाजार घसरणीसह बंद झाले आहेत.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसभरात 700 अंकांनी चढउतारात राहिला आहे. अंतिमक्षणी 59.04 अंकांनी घसरुन 57,832.97 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 28.30 अंकांनी घसरुन 17,276.30 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये शुक्रवारी अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि नेस्ले यांचे समभाग 1.88 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यामध्ये सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभाग घसरणीसह बंद झाले.
जागतिक घडामोडींचा दबाव
जगातील विविध घडामोंडीच्या प्रभावात शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात आलेली घसरण आणि दुसऱया बाजूला युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थितीच्या संकेताने भारतीय बाजारात पडझड झाली आहे.
वरील परिस्थितीच्या वातावरणामुळे गुंतवणूकदार अमेरिकन बॉण्ड आणि सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित मानतात परंतु त्याकडेच गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. याचदरम्यान जागतिक बाजारात कच्चे तेल 2.19 टक्क्यांनी घसरले होते.








