वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
जागतिक शांततेसाठी तसेच समृद्धीसाठी, कोरोना संकटाशी लढण्यासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी क्वाडचे सदस्य एकमेकांना सहकार्य करतील, असे शनिवारी अमेरिकत झालेल्या ‘क्वाड’च्या बैठकीत एकमताने ठरले. 2004 च्या सुनामीनंतर हिंद-प्रशांत महासागरातील जनतेच्या हितांसाठी क्वाडचे सदस्य पहिल्यांदाच एकत्र आले. या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील स्थितीबाबत चर्चा करतानाच तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यावरही विचारमंथन झाले. तथापि, त्याबाबत सविस्तरपणे माहिती उघड करण्यात आलेली नाही.
मोदी-बायडेन द्वयींमधील यशस्वी भेटीनंतर अमेरिकेत क्वाड देशांची बैठक झाली. या बैठकीत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचे नेते सहभागी झाले. वॉशिंग्टन येथे झालेल्या या शिखर परिषदेचे यजमानपद अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी प्रथमच घेतले. भारताकडून क्वाडच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. या बैठकीत राजकीय, आर्थिक, मानवाधिकारांच्या रक्षणासाठी, दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी तसेच कोरोना संकटाच्या विरोधात लढण्यासाठी परस्पर सहकार्य करण्यावर एकमत झाले. बैठकीत अफगाणिस्तानमधील परिस्थिती, दहशतवाद, कोरोना संकट, इंडो-पॅसिफिक समुद्रातील सहकार्य यावर चर्चा झाली.
‘क्वाड’च्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा सहभागी झाले. संयुक्त राष्ट्रांमध्ये 2593 क्रमांकाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या प्रस्तावानुसार अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद निर्माण होणार किंवा वाढणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. या प्रस्तावाचे पालन करण्यासाठी क्वाडचे सदस्य एकमेकांना आवश्यक ते सहकार्य करतील; असे बैठकीत एकमताने ठरले. अफगाणिस्तानच्या हितासाठी परस्पर सहकार्यातून एक धोरण निश्चित करण्यावरही बैठकीत एकमत झाले. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील स्थितीबाबत चर्चा करताना येथे शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी सर्व देशांनी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘क्वाड’ म्हणजे काय?
‘क्वाड’ला ‘क्वाड्रिलेटेल सिक्मयोरिटी डायलॉग’ असे संबोधले जाते. हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा अनधिकृत सामरिक गट आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाही देशांच्या हितांचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हाने हाताळणे हे ‘क्वाड’चे मुख्य उद्दिष्ट आहे. याची स्थापना 2007 मध्ये झाली. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान केव्हिन रुड यांनी गटातून माघार घेतली. तेव्हापासून हा गट सक्रिय नव्हता. मात्र, चीनच्या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली हा गट पुन्हा सक्रिय झाला.









