555 अंकांनी घसरण – इंडसइंड, टाटा-बजाज नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजाराचा तेजीचा प्रवास खंडित झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील बाजारांमधील विक्रीच्या दबावामुळे बीएसई सेन्सेक्स गडगडला असल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग घसरणीत राहिले आहेत. याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स 555 अंकांनी नुकसानीत राहिला.
दिग्गज कंपन्यांच्या नुकसान सत्रामुळे दिवसअखेर सेन्सेक्स 555.15 अंकांनी प्रभावीत होत 0.93 टक्क्यांसह निर्देशांक 59,189.73 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 176.30 अंकांसह 0.99 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 17,646.00 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी घसरले होते, यासोबत टाटा स्टील, बजाज ऑटो, एचसीएल टेक, सन फार्मा आणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला एचडीएफसी बँक, एचडीएफसी तसेच बजाज फायनान्स यांचे समभाग मात्र नफा कमाईत राहिले होते.
जागतिक बाजारात आशियातील हाँगकाँगचा हँगसेग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी व जपानचा निक्की घसरणीत होता.
मुख्य घडामोडींचा परिणाम
जागतिक पातळीवर नकारात्मक वातावरण राहिल्याने बाजारात धातू आणि आयटी समभागात नफा वसुलीचा प्रभाव राहिल्याने बाजाराने सुरुवातीची तेजी गमावत नंतर घसरणीकडे वाटचाल चालू ठेवली होती.
दिवसागणिक वाढत जाणाऱया कच्च्या तेलाच्या किमतीचा प्रभाव हा भारतीय भांडवली बाजारावर होत असून अमेरिकन बॉण्डचाही परिणाम राहिल्याचे दिसून आले. या व्यतिरिक्त आरबीआयची पतधोरण बैठक होत असून यामध्ये केंद्रीय बँकांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे संकेत आहेत. याचा प्रभाव बाजारावर राहिला आहे.









