प्रतिनिधी / मडगाव :
मठग्रामस्थ तसेच तमाम गोव्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दामबाबाच्या चरणी होणाऱया जांबावलीच्या शिगमोत्सवाला प्रारंभ झाला आहे. बुधवारी जांबावली येथे श्री दामोदराचा हळदुण्याचा कार्यक्रम आणि कोंबवाडा-मडगाव येथील कै. पुरूषोत्तम केणी यांच्या घरी नारळाजी पूजा झाली. काल गुरूवारी सायंकाळी 6 वाजता बँण्ड वादनासह या नारळाचे जांबावलीकडे प्रयाण झाले.
विठ्ठलवाडीहून बँण्ड वादनासह हरदास त्रिविक्रम पै रायतूरकर यांच्या निवासस्थानी प्रयाण झाले. सायंकाळी 6 वा. कोंबवाडा येथील कै. पु. पा. केणी यांच्या घरी पुजलेल्या नारळाची भव्य मिरवणूक जांबावली येथे श्री दामोदर संस्थानाकडे रवाना झाली. नंतर रात्री 10 वा. ‘सं. सीता स्वयंवर’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात आला.
आज शुक्रवार दि. 13 रोजी रात्री 9 वा. फ्रायडे सुपरस्टार प्रस्तुत कोकणी नाटक ‘दोडामार्ग’ दी फॉल्डेड रोड’ सादर करण्यात येईल. शनिवार दि. 14 रोजी रात्री 10 वा. मठग्रामस्थ हिंदु सभा कला विभागातर्फे तीन अंकी मराठी विनोदी नाटय़प्रयोग ‘घेतलं शिंगावर’ सादर केला जाणार आहे.
रविवार दि. 15 रोजी संध्याकाळी 7 वा. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर रात्री 10 वा. रणजित देसाई लिखित ‘श्रीमान योगी’ हे ऐतिहासिक नाटय़प्रयोग सादर केला जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक वैकुंठ पै फोंडेकर व निर्मिती नारायण पै फेंडेकर यांची आहे. या नाटकात शर्मद पै रायतुरकर, महेश नायक, दामबाब नायक, शौमिक पै आंगले, प्रविणा शिरसाट महालक्ष्मीकर, डॉ. कमलेश पै फोंडेकर, शाम दा. नायक, यागेश घोडे, सचिन महालक्ष्मीकर, महेश पै फोंडेकर, कौशिक पै फोंडेकर, सौ. शितल सांबारी, वैकुंठ पै फोंडेकर, वैष्णवी पै काकोडे, स्मिता पै काकोडे, विनित दलाल, शांतेश फोंडेकर व श्वेतांग फोंडेकर यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
सोमवार दि. 16 रोजी संध्याकाळी 6 वा. वेशभूषा व नृत्य स्पर्धा घेतली जाणार आहे. दोन्ही स्पर्धांसाठी सात वर्षांपर्यंत व सात ते चौदा वर्षापर्यंतची मुले सहभागी होऊ शकतील. त्यानंतर रात्री 9 वा. 35 कलाकारांचा समावेश असलेला लावणी कार्यक्रम ‘लावण्यतारका’ सादर करण्यात येईल. तद्नंतर पहाटे 3 वा. संगीत पौराणिक नाटक संगीत ‘शांतिब्रम्ह’ सादर करण्यात येईल.
मंगळवारी गुलालोत्सव
संपूर्ण गोव्यात तसेच शेजारील राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेला श्री दामबाबाचा गुलालोत्सव मंगळवार दि. 17 रोजी संध्याकाळी 3.30 वा. साजरा होणार आहे. दामबाबाच्या पालखीवर गुलाल उधळल्यानंतर संपूर्ण दामबाबाचा परिसर गुलालोत्सवाने फुलणार आहे. भाविकांनी फक्त ‘लाल’ रंगाचा गुलाल वापरावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गुलालोत्सवानंतर रात्री 11 वा. ‘नवरदेवाची वरात’ निघणार आहे. रात्री 12 वा. सदाबहार संगीताचा कार्यक्रम ‘संगीत सभा’ होईल. बुधवार दि. 18 रोजी सकाळी 11 वा. होणाऱया ‘धुळपेट’ने जांबावली शिमगोत्सवाची सांगता होईल.