ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील वर्षी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने काटेरी दांडे, टीझर गन यासारख्या कमी प्राणघातक शस्त्रांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. त्यानंतर भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एपेस्टेरॉन कंपनीला कमी प्राणघातक शस्त्रे तयार करण्याची ऑर्डर दिली होती. त्यानुसार या कंपनीने दोन हत्यारे विकसित केली आहेत. एपेस्टेरॉन या कंपनीचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोहित कुमार यांनी एका वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे.
मोहित कुमार म्हणाले, सध्या चिनी सैन्य सीमेवर कमी प्राणघातक शस्त्रे बाळगते. त्याप्रमाणेच आम्ही संरक्षण दलाच्या ऑर्डरनुसार एक त्रिशूळ तयार केला आहे. त्याला खास प्रकारचे ग्लव्हजही आहेत. ग्लव्हज हातात घालून समोरील व्यक्तीवर त्रिशूळ मारल्यास त्यांना विजेचा धक्का बसतो. शुत्रूच्या वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच लोखंडाचे काटे असलेला एक दांडाही तयार करण्यात आला आहे. त्याचे नामकरण वज्र असे करण्यात आले आहे. हत्यार विरोधी चकमकीसाठी हे शस्त्र उपयोगी पडणार आहे. वज्राच्या काटय़ाद्वारे विजेचे चटके देऊन प्रतिस्पर्धी सैन्याला काही काळ बेशुद्धही करता येते.