नागरिकांची गैरसोय : जलशुद्धीकरण यंत्र दुरुस्ती-पंप बसविण्याकडे दुर्लक्ष : पुनरुज्जीवन केलेल्या विहिरींचा पाणीपुरवठा करावा
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंटला केंद्रशासनाकडून निधी मिळण्याचे बंद झाल्याने आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. पाणी आणि विद्युत बिलाची रक्कम थकली आहे. त्यामुळे कधी पथदीपांचा विद्युतपुरवठा, तर कधी पाणीपुरवठा बंद केला जात असल्याने कॅन्टोन्मेंटवासियांची गैरसोय होत आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात असंख्य विहिरी असूनदेखील स्वतःचा जलस्रोत निर्माण करण्याकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष झाले आहे.
केंद्रशासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला सेवाकर दिला जात होता. मात्र शासनाने सेवाकर रद्द करून जीएसटी लागू केला आहे. मात्र यातील अनुदान कॅन्टोन्मेंटला दिले जात नाही. कोरोनामुळे तीन वर्षे उत्पन्नाचे साधन बंद झाले होते. अशातच केंद्र आणि राज्य शासनाने कॅन्टोन्मेंटला दिला जाणारा निधी बंद केला आहे. परिणामी कॅन्टोन्मेंटची चार कोटीच्या घरात विद्युत बिलाची रक्कम आणि दोन कोटी पाणी बिलाची रक्कम थकली आहे. त्यामुळे सदर बिल भरण्यासाठी हेस्कॉम आणि एलऍण्डटीकडून तगादा लावला जात आहे.
पाणीपट्टी व वीजबिल भरण्याकरिता हेस्कॉमकडून विद्युतपुरवठा आणि एलऍण्डटीकडून पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ‘कधी बत्ती गुल तर कधी पाणी नाही’ अशी अवस्था मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करावा याकरिता महिलांनी सोमवारी सायंकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डवर मोर्चा काढून निवेदन सादर केले. तात्पुरते टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. व पाणी समस्येचे निवारण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण ठोस आश्वासन देण्यात आले नाही. वास्तविक पाहता पाणी समस्येची बोंब नेहमीच होत असते. पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री अनुदानांतर्गत तत्कालीन आमदारांनी 25 लाखांचा निधी कॅन्टोन्मेंटला देवू केला होता. त्या अंतर्गत कॅम्प परिसरात असलेल्या सोईओ बंगल्या शेजारील विहिरीचे पुनरूज्जीवन करून स्वच्छता करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र व पंप बसवून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र हे जलशुद्धीकरण यंत्र आणि पंप आजपर्यंत सुरू करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट कार्यालय आवारात देखील मोठी विहीर आहे. तसेच किल्ला परिसरात देखील जुन्या विहिरी आहेत.
या विहिरीतील पाण्याचा वापर करून कॅन्टोन्मेंटवासियांची तहान भागविणे शक्मय आहे. पण यादृष्टीने कॅन्टोन्मेंटकडून कोणत्याच उपाय-योजना राबविल्या जात नाहीत.
केवळ शासनाच्या निधीवर आणि मनपाच्या पाण्यावर अवलंबून राहून कारभार केला जातो. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील बंगल्यांमध्ये तसेच विविध ठिकाणी ब्रिटिशकालीन विहिरी आहेत. या विहिरींतील पाण्याचा वापर करून पाणी समस्येचे निवारण करता येवू शकते. मात्र कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांनी याकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. पुनरूज्जीवन केलेल्या विहिरीतील पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दहा दिवसांपासून पाणीपुरवठा नाही
पाण्यासाठी यापूर्वी महिलावर्गाने कॅन्टोन्मेंटवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पाणीपुरवठा सुरळीत आणि मुबलक केला जाईल, असे आश्वासन दिले होते. पण दोन महिने झाले नाहीत. तोच आता पुन्हा पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून काही भागात पाणीपुरवठा केला नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.









