बर्लिन
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगच त्रस्त असताना तिकडे जर्मनीत मात्र सध्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीबाबत सध्याला संशयाचे वारे वाहताना दिसत आहेत. सदरच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात पोस्टल बॅलेटचा वापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही लोकांनी यामध्ये फेरफार केला जाण्याचा संशय व्यक्त केला असून एकूणच गोंधळ उडण्याची भीती व्यक्त केलीय. जर्मनीतील अनेकांना या कोरोना काळात घरात राहून मतदान करणे जास्त सोयीचे वाटते आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यावर्षी पोस्टल बॅलेटद्वारे होणाऱया मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांवर जाऊ शकते. मागच्या म्हणजेच 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 28 टक्के इतके मतदान पोस्टल पद्धतीने झाले होते. अशाप्रकारे पोस्टाने मतदान करण्याच्या प्रक्रियेला जर्मनीत 1957 पासून सुरूवात झाली होती.