प्रतिनिधी/विटा
माजी मंत्री जयंतराव पाटील (Jayant Patil) हे एक सुसंस्कृत राजकारणी आहेत. ते महाराष्ट्रातील बडया नेत्याचे चिरंजीव आहेत. मी त्यांना गेली 25 ते 30 वर्षे ओळखतो. ते अनेक वर्षे मंत्री राहिलेले आहेत. मंत्री हे संवीधानीक पद आहे त्यामुळे या पदाबाबत मंत्री, संत्री असे असंविधानिक शब्द ते बोलतील असे वाटत नाही. जयंतरावांच्या आडून कोणी बगलबच्चे असे काही बोलत असतील तर माझे यापुढे त्यांच्यावर बारीक लक्ष राहील, असा इशारा आमदार अनिल बाबर यांनी दिला.
सोमवारी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे विटयात आले होते. त्यावेळी मंत्री संत्री कोणीही होवू दया, सगळयांचा सात बारा माझ्याकडे आहे, असे वक्तव्य त्यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले होते. आमदार अनिल बाबर यांचा मंत्रीमंडळातील संभाव्य समावेशाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जयंतराव पाटील यांच्या टीकेचा रोख नाव न घेत आमदार बाबर यांच्यावर होता. परंतू असे घडणे अशक्य आहे. जयंतराव असे बोलणारच नाहीत, त्यांना मी पूर्णपणे ओळखतो, अशा शब्दात आमदार बाबर यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्थानिक नेत्यांना इशारा दिला आहे.
आमदार बाबर म्हणाले, जयंतराव पाटील स्वतः राज्य मंत्रीमंडळात अनेक वर्षे मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यामुळे मंत्री या संविधानीक पदाबाबत मंत्री, संत्री असे ते वक्तव्य कधीच करणार नाहीत. परंतू काही मंडळींना त्यांच्या आडून राजकारण करायचे आहे. त्यांनी हा खोडसाळपणा करून जयंतराव यांच्या तोंडी असे भलतेच शब्द घातले असावेत, अशी आपली शंका आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जयंतराव पाटील यांच्यासारख्या राजकारणातील सुसंस्कृत नेत्याचा असा वापर करून घेणे अशोभनीय आहे. पण मी याच्या खोलात जाणार आहे. हे नेमके कोणाच्या सुपिक डोक्यातून आले आहे, त्यांना माझा इशारा आहे. तुमच्याकडे माझा सातबारा असेल, तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे, अशा शब्दात आमदार बाबर यांनी स्पष्टीकरण दिले.








