अमित शहांचा सवाल : पश्चिम बंगाल दौऱयात ममता बॅनर्जींवर कडाडले
कोलकाता / वृत्तसंस्था
आगामी विधासभा निवडणुकांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी कूचबिहार येथे एक सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘जय श्रीराम बंगालमध्ये म्हणणार नाही, तर मग पाकिस्तानात जाऊन म्हणायचे काय?’ असा प्रश्न त्यांनी तृणमूल काँग्रेसला उद्देशून केला.
पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम म्हणणे हा एक गुन्हाच असल्यासारखे सर्वत्र वातावरण निर्माण केले जात आहे. या अनुषंगाने अमित शहा यांनी उपस्थित बंधु आणि भगिनींसमोर विविध प्रश्न उपस्थित केले. तसेच सभेसाठी आलेल्या जनसमुदायाकडूनही त्यांनी ‘जय श्रीराम’ असा घोष करवून घेतला. पुढे बोलताना त्यांनी ‘ममता दीदींना हा अपमान वाटतो. संपूर्ण देश आणि जगभरातील अनेकजण आपल्या आराध्य श्रीराम यांच्या स्मृतींनी गौरवान्वित होतात. पण, तुम्हाला मात्र याचा त्रास होतो. कारण, तुमचं लक्ष अमुक एका गटाकडून मिळणाऱया मतांकडेच आहे.’ असे म्हणत तुम्हाला यांची मते नको आहेत, असे समोर उपस्थित असणाऱया जनसमुदायाला उद्देशून म्हटले. तसेच निवडणूक संपेपर्यंत केवळ एका विशिष्ट वर्गाची मते मिळविण्यासाठी ममता बॅनर्जीदेखील ‘जय श्रीराम’ म्हणतील, असेही ते पुढे म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांच्या तृणमूलकडूनच हत्या!
तृणमूल काँग्रेस पक्षाचे ‘गुंड’ येथे भाजपची सत्ता येण्यापासून रोखू शकणार नाहीत, असे म्हणत परिवर्तन रॅली ही मुख्यमंत्री किंवा नेता बदलण्यासाठी नसून घुसखोरी रोखण्यासाठीच आहे, असे ठाम वक्तव्य केले. ‘बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत 130 पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही’ असा गंभीर आरोप त्यांनी तृणमूलवर केला. तसेच, भाजपचे सरकार सत्तेवर येताच एका आठवडय़ात बंगालमध्ये आयुष्मान योजना लागू केली जाईल. ममता बॅनर्जी मे महिन्यानंतर केंद्राच्या योजना लागू होण्यापासून रोखू शकणार नाहीत, असेही ते पुढे म्हणाले.
आतापासूनच प्रचारतोफा गरम
दरम्यान, एप्रिल-मे महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच प्रचारसभा, सभा यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ममता सरकारमधील उणिवा शोधण्यात विरोधक व्यग्र आहेत, तर सत्ताधारी मात्र सरकारच्या विकासकामांच्या बळावर मतदारांना विश्वासात घेत आहेत. आतापासूनच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप व तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.









