नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरच्या विकासाकरता 80 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यासंबंधीची माहिती बुधवारी दिली आहे. या पॅकेजच्या माध्यमातून केंद्रशासित प्रदेशातील विकासकामांना प्रचंड वेग मिळणार आहे. तसेच अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
केंद्र सरकारचे अनेक मंत्री सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. तेथील विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री सातत्याने या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करत आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि महिला तसेच बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी तेथील दौरा करत विकासकामांची पाहणी केली आहे. तर नवी दिल्ली येथे आयोजित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी या मंत्र्यांकडून काश्मीरसंबंधी फीडबॅक घेतला आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी हे देखील जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱयावर असून त्यांच्या हस्ते अनेक विकासप्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. रेड्डी हे काश्मीर खोऱयातील ग्रामीण क्षेत्रांचा दौरा करणार असून विविध विकासकामांची समीक्षा करणार आहेत.
केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केले होते. सरकारने जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले होते. जम्मू-काश्मीर तसेच लडाख यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयापासून दोन्ही केंद्रशासित प्रदेशांवर केंद्र सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे.









