जमखंडीत दोन महिलांना कोरोनाची बाधा
वार्ताहर/ जमखंडी
जमखंडीत आज दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्याने जमखंडीतील कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली तर बागलकोट जिल्हय़ात एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या 26 झाली. जमखंडीतील खाटीक गल्लीतील 32 व 21 वर्षाच्या महिलांचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना बागलकोट येथील जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांचे रुग्ण क्रमांक 508 व 509 असून त्यांना रुग्ण क्रमांक 456 च्या संपर्काने बाधा झाली असून हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. या अगोदरच हा परिसर सीलडाऊन करून येथे औषध फवारणी करण्यात आली आहे. जमखंडी पोलीस वसाहत, भारपेठ गल्ली, अवटी गल्ली, खाटीक गल्ली या भागात कोरोना रुग्ण आढळल्याने हे परिसर सील करण्यात आले आहेत.









