टोकियो / वृत्तसंस्था
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या राजीनाम्यानंतर नव्या पंतप्रधानावरून कयास सुरू आहेत. या पदाच्या शर्यतीत सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे (एलडीपी) धोरणप्रमुख फुमियो किशिदा आणि माजी संरक्षणमंत्री शिगेरू इशिबा यांची नावे आघाडीवर आहेत. अबे यांनी राजीनामा दिल्यावर दोन्ही नेत्यांनी त्वरित हे पद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचबरोबर कॅबिनेट सचिव योशिहिडे सुगा यांनीही पंतप्रधान होण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत.
अबे यांनी राजीनामा देताना पुढील पंतप्रधानाच्या नावावर काहीही सांगणे टाळले होते. नवा पंतप्रधान लवकर निवडला जावा असे आवाहन त्यांनी स्वतःला एलडीपी या पक्षाला केले होते. अबे यांनी एलडीपीचे महासचिव आणि खासदार तोशिहिरो निकाइ यांना नवा नेता निवडण्याशी संबंधित कामांची पूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
एलडीपीतील प्रक्रिया
एलडीपीत पंतप्रधान निवडणुकीद्वारे निवडला जातो. यात पक्षाच्या किमान 20 उमेदवारांची यादी तयार केली जाते. किमान 12 दिवसांच्या प्रचारानंतर पक्षाचे डाइट मेंबर्स (संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य) मतदान करतात. सर्वाधिक मते मिळविणाऱया नेत्याला पंतप्रधान केले आहे. सध्या महामारी फैलावलेली असल्याने सर्व सदस्यांना मेलने बॅलेट पाठविण्यात आणि मतदानाशी संबंधित कामे पूर्ण करण्यास अधिक वेळ लागू शकतो.
दुसरी पद्धत
आपत्कालीन स्थितीत पंतप्रधान निवडण्यासाठी दुसरी पद्धत अवलंबिली जाते. या डाइट मेंबर्स आणि देशाच्या सर्व 47 राज्यांच्या प्रतिनिधींच्या मदतीने मतदान करविले जाते. या पद्धतीत मतदान करण्यास कमी कालावधी लागतो. वर्तमान स्थिती पाहता याच पद्धतीने मतदान होण्याची शक्यता आहे. एलडीपीचे महासचिव तोशिहिरो निकाइ 15 सप्टेंबर रोजी मतदान आयोजित करू शकतात.
अबे यांचे टीकाकार
पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले माजी संरक्षणमंत्री शिगेरू इशिबा हे शिंजो अबे यांचे टीकाकार राहिले अहेत. 63 वर्षीय इशिबा हे प्रभावी वक्ते मानले जातात. त्यांनी 2018 मध्ये पंतप्रधान निवडण्याच्या प्रक्रियेत अबे यांना आव्हान दिले होते. परंतु खासदारांचे समर्थन प्राप्त करण्यास ते अयशस्वी ठरले होते. सद्यस्थितीत इशिबा यांना 19 खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. इशिबा यांनाच जनतेची पसंती असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.









