वृत्तसंस्था/ टोकियो
कोरोना महामारी संकटामुळे जपानमधील सर्व क्रीडा हालचाली स्थगित करण्यात आल्या होत्या. जवळपास तीन महिने या देशामध्ये कोणत्याही स्पर्धा घेतल्या गेल्या नाहीत. दरम्यान, कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्याने जपानच्या शासनाने काही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील व्यावसायिक बेसबॉल आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारातील सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीला शासनाने अधिकृत परवानगी दिली आहे.
शुक्रवारी जपानमध्ये व्यावसायिक बेसबॉल आणि फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने खेळविले जातील. विविध स्टेडियम्समध्ये असलेल्या क्षमतेच्या 50 टक्के शौकिनांना उपस्थित राहण्याची मुभा राहील. मात्र, शौकिनांची कमाल संख्या 5 हजारपेक्षा अधिक राहू नये, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, 1 ऑगस्टपासून या दोन्ही क्रीडा प्रकारातील सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीची संख्या वाढविली जाईल, असे सांगण्यात आले. स्टेडियममध्ये कोरोनासंदर्भातील सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी दक्षता घेतली जाईल, असे जपान फुटबॉल लिगचे प्रमुख मुराई यांनी सांगितले.
स्टेडियमच्या कक्षामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. जपानमधील बेसबॉल हंगामाला 19 जूनपासून प्रारंभ झाला होता तर येत्या शनिवारपासून फुटबॉल हंगाम सुरू होईल.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात जपान लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या फेरीतील काही सामने झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार सुरू झाल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. जपानमध्ये आतापर्यंत सुमारे 1 हजार लोकांचे कोरोनामध्ये बळी गेले आहेत. टोकियोमध्ये गेल्या रविवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सलग चार दिवसांमध्ये टोकियोत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभर झाली आहे.









