दाखल्याची नोंद आता ई-जन्म संगणक प्रणालीवर : 21 दिवसांच्या आत नोंद करणे बंधनकारक
प्रतिनिधी / बेळगाव
जन्म व मृत्यू दाखल्याची नोंद आता ई-जन्म या संगणक प्रणालीवर होत आहे. त्याचप्रमाणे सेवा सिंधू केंद्रात जन्म-मृत्यू दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जन्म-मृत्यू दाखल्याच्या नोंदीसाठी लागणारा अवधी आणि कागदपत्रांची माहिती नागरिकांना देण्यासाठी महापालिकेने आता कार्यालयात माहिती फलक लावले आहेत.
जन्म-मृत्यू दाखल्याची नोंद 21 दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. 21 दिवस ते 1 वर्षापर्यंत असल्यास प्रतिज्ञापत्राद्वारे जन्म मृत्यूची नोंद करता येवू शकते. 1 वर्षाहून अधिक कालावधी असल्यास अशा जन्म-मृत्यू नोंदीसाठी न्यायालयातून अधिकृत आदेश घेणे बंधनकारक आहे. याकरिता लागणाऱया कागदपत्राची माहिती देखील फलकाद्वारे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. जन्म-मृत्यू कक्षासमोर सदर फलक लावण्यात आले आहेत.
दवाखान्यामध्ये जन्म-मृत्यू झाल्यास त्याची माहिती ऑनलाईनद्वारा नोंद केली जाते. जर नोंद झाली नसल्यास जन्म दाखल्याच्या नोंदीसाठी पालकांचे ओळखपत्र, प्रसूती झालेल्या दवाखान्याचा दाखला आणि पालकांच्या विवाह नोंदणीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. तसेच मृत्यू दाखल्याच्या नेंदीसाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे ओळखपत्र त्यांच्या पश्चात आई-वडील असल्यास त्यांची माहिती व ओळखपत्र, घरी मृत्यू झाल्यास त्याचे कारण अशी विविध माहिती द्यावी लागणार आहे. तसेच आधार ओळखपत्र, अडेस प्रूफ, अर्ज आणि रेशनकार्ड आदी कागदपत्रे मृत्यू दाखला नोंदीसाठी द्यावी लागणार आहेत. तसेच जन्म-मृत्यू दाखल्यातील दुरुस्तीसाठी विविध कागदपत्रांची जोडणी करावी लागणार आहे. त्याची माहिती देखील फलकाद्वारे देण्यात आली आहे.
जन्म-मृत्यू दाखल्याबाबत सातत्याने तक्रारी होत असतात. वेळेत दाखला मिळत नसल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करतात. कोणती कागदपत्रे जोडायची याची माहिती व्यवस्थित मिळत नाहीत. त्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागाने सदर माहिती फलक लावले असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी सांगितले.









