राज्य शासन, पशुसंवर्धन विभागाची मोहीम : जिल्ह्य़ात 31 डिसेंबरपर्यंत होणार लसीकरण
विजय पाडावे / रत्नागिरी
शेतकऱयांना जनावरांची खबरदारी घ्यावीच लागणार आहे… गाय, म्हैस, बैल यांच्या कानात बिल्ला मारून घ्या… अन्यथा या गुरांवर कोणताही अपघाती प्रसंग आल्यास नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हय़ातही लसीकरणावेळी टॅगिंग (बिल्ला) करून जनावरांना आधार क्रमांकासारखाच ओळख क्रमांक दिला जात आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
राष्ट्रीय रोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गंत जिल्हय़ातील जनावरांना ‘लाळय़ा खुकरत’ रोगप्रतिबंधक लसीकरण करतानाच या जनावरांचे टॅगिंगही केले जात आहे. त्यांना आधार क्रमांकासारखाच ओळख क्रमांक देण्यात येत आहे. या क्रमांकामुळे जनावरांची खरेदी-विक्री करणे सोपे होणार असून आपत्तीत ही जनावरे दगावल्यास या टँगिंगमुळे भरपाई मिळण्याचा मार्गही सुकर होणार आहे.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या या मोहिमेत जिल्ह्य़ातील 2 लाख 49 जनावरांच्या लसीकरणाची योजना आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 909 जनावरांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणासोबतच पशुधनाच्या कानात बारा आकडी क्रमांक असलेला टॅग टोचला जात ओह. या क्रमांकाची ऑनलाईन नोंद शासनाच्या पोर्टलवर होणार असून जनावरांची ओळख सहज पटण्यास याची मदत होणार आहे. असा टॅग नसल्यास त्यांची खरेदी-विक्री करता येणार नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात आहे. बँकेमार्फत जनावरे घेतल्यास त्यांचा विमा उतरवणे व विमा रक्कम मिळण्यासाठीही टॅग आवश्यक ठरणार आहे.
जनावरांना टॅगिंग असल्यास या प्रसंगात मिळेल लाभः
- नैसर्गिक आपत्तीत दगावल्यास
- वीज पडून मृत्यू झाल्यास.
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास.
- वीजवाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्यास.
काय आहे लाळय़ा खुककुत?
लाळय़ा खुकरत हा गाय, म्हैस, बैल, वासरे यांना होणारा विषाणुजन्य सांसर्गिक आजार आहे. या आजाराला तोंडखुरी, पायखुरी असेही म्हटले जाते. याचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे जनावरांची उत्पादकता व कार्यक्षमतेत लक्षणीय घट होते. दुधाळ जनावरांच्या दुध उत्पादनातही मोठी घट होते.
पशुपालकांचे सहकार्य आवश्यक
तोंडखुरी, पायखुरी लसीकरण मोहीम पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जात आहे. याशिवाय पशुधनाला बिल्ला टोचून टॅगिंग केले जात आहे. सर्व पशुपालकांनी लसीकरणासोबतच बिल्ला टोचून घेत मोहिमेला सहकार्य करावे.
– डॉ. यतीन पुजारी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी









