प्रक्रिया सुरूच राहणार – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सीआरझेडची जनसुनावणी स्थगित अथवा रद्द झालेली नाही. ती सुरूच राहणारी प्रक्रिया आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. गेले दोन दिवस जिल्हय़ात सागरी किनारा क्षेत्र प्रारुप आराखडय़ावर (सीआरझेड) जनसुनावणी घेण्यात येत आहे. मात्र या ऑनलाईन सुनावणीला जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी तसेच जनतेने विरोध दर्शवला आहे. जनसुनावणी जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन सभागृहात आणि पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. मात्र नेटवर्क समस्या निर्माण झाली. त्यामुळे ही जनसुनावणी होऊ शकली नाही. अनेकांनी या जनसुनावणीतून काढता पाय घेतला. सोमवारी जिल्हास्तरावर झालेली आणि मंगळवारी तालुकास्तरावर झालेली सीआरझेडची जनसुनावणी नेटवर्क समस्येमुळे आणि काही अधिकारी उपस्थित राहू न शकल्याने पूर्ण होऊ शकली नाही. मात्र ही जनसुनावणी स्थगित अथवा रद्द झालेली नाही, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
जनसुनावणीची ही प्रक्रिया यापुढेही सुरूच राहील. जास्तीत जास्त जनतेने यात सहभाग घेऊन आपल्या हरकती नोंदवाव्यात. आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले. जनसुनावणीमध्ये काही अडचणी असल्यास, जरुर सांगाव्यात. मात्र जनसुनावणी बंद पाडू नये किंवा गोधळ घालू नये. अनेक लोकांना हरकती नोंदवायच्या आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे जनसुनावणी पूर्ण होईपर्यंत प्रकिया सुरू राहणार आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.









