मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr यांचा दावा
प्रतिनिधी / कणकवली:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा रुग्णालयातील जनआक्रोश आंदोलनामुळेच जिल्हा प्रशासनाला जाग आली. गेली कित्येक महिने मनसेच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे आवाज उठवित आहोत. कोविडसाठी आलेल्या 77 लाख रुपयांमधून शल्य चिकित्सकांनी केलेल्या कोविड उपाययोजना या दिशाभूल करणाऱया आहेत. आज प्रत्येक कोविड सेंटरला असलेल्या रुग्णांना जेवण, पाण्याची, व्यवस्था पोषक नाही. सोबत शौचालय स्वच्छता नाही. गुरांना कोंडवाडय़ात ठेवल्याप्रमाणे कोविड रुग्णांना ठेवण्यात येत आहे. रुग्णांसाठी हे घातक आहे, असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आज जिल्हाधिकारी यांनी रुग्णांना सकस जेवणासोबत यथायोग्य सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. नक्कीच मनसेच्या जनआक्रोश आंदोलनाला यश आले. गेल्या बारा दिवसांत 20 रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंना जिल्हा शल्य चिकित्सकांचा भ्रष्टाचार व हटवादी भूमिका जबाबदार असून असे अधिकारी जिल्हय़ासाठी घातक आहेत. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्री या झालेल्या भयावह परिस्थितीस जबादार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, कोविड रुग्णांना वेगवेगळय़ा स्वरुपात मदत केल्याचे दिसते. मग ती मदत अन्नधान्याची, औषधांसोबत आरोग्य सुविधांची, रुग्णांना न मिळणारे बेड, व्हेंटिलेटर असो की कामगारांच्या पगाराची किंवा गणेशोत्सवात गावोगावी जाण्यासाठी केलेल्या मोफत बससेवेची असो. मनसे आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत असल्याचे मेस्त्राr यांनी म्हटले आहे.









