दक्षिण कोरियात दरवर्षी 5 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग
9 तास चालते परीक्षा, युवांमध्ये नैराश्य अन् आत्महत्येस कारणीभूत
दक्षिण कोरियात सोलनजकी जॉगयेशा मंदिरात नोव्हेंबर महिन्यात पालकांची मोठी गर्दी असते. हे पालक स्वतःच्या मुलांसाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने येतात. कारण त्यांची मुले जगातील सर्वात अवघड विद्यापीठ प्रवेश परीक्षेला बसतात. नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ात होणारी ही सुनेयुंग परीक्षा 9 तासांपर्यंत चालते. यात दरवर्षी 5 लाख विद्यार्थी सामील होत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण होणे दक्षिण कोरियात उच्चशिक्षण घेण्यास इच्छुक प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. पूर्ण देश या परीक्षेची प्रतीक्षा करत असतो.

ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे उज्ज्वल भविष्य तसेच विवाहाचीही हमी असते. पण या अवघड परीक्षेवरून दक्षिण कोरियातही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ही परीक्षा सोपी करण्यात यावी, या परीक्षेमुळे युवांमध्ये नैराश्य वाढतेय. विकसित देशांमध्ये दक्षिण कोरियात युवांमध्ये सर्वाधिक आत्महत्येचे प्रमाण असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. युवांमधील आत्महत्येचे प्रमाण मागील 5 वर्षांमध्ये 10 टक्क्यांनी वाढले आहे. सुनेयुंगमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने दरवर्षी अनेक जण आत्महत्या करतात. तसेच याचा मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडतो.
परीक्षेकरता विशेष तयारी
या परीक्षेत सामील होणारा विद्यार्थी उशिरा पोहोचू नये म्हणून सोलमध्ये वाहतूक, रेल्वे आणि विमानसेवेचे वेळापत्रक बदलले जाते. शासकीय कार्यालये, बँका आणि स्टॉक मार्केट देखील एक तास विलंबाने सुरू होते. परीक्षा सकाळी 8.45 वाजल्यापासून सुरू होते. उशीर होण्याची स्थितीत विद्यार्थ्यांसाठी पोलिसांची वाहने आणि बाइकद्वारे सेवा पुरविली जाते. या वाहनांमध्ये बसून विद्यार्थी शाळेत पोहोचू शकतात.









