वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक नेत्यांच्या त्यांच्या कार्यकाळात स्वीकृती किंवा त्यांच्या लोकप्रियतेवर नजर ठेवणाऱया डाटा कंपनीच्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अप्रूवल रेटिंग सर्वात अधिक आहे. पंतप्रधान मोदी 55 टक्के अप्रूवल रेटिंगसह जागतिक नेत्यांमध्ये अग्रस्थानी आहेत.
जागतिक स्तरावर संशोधन तसेच सर्वेक्षण करणारी कंपनी मॉर्निंग कंसल्टच्या नव्या सर्वेक्षणानुसार 75 टक्के लोकांनी मोदींना समर्थन दिले आहे. तर 20 टक्के जणांनी त्यांना विरोध दर्शविला आहे. त्यांचे एकूण अप्रूवल रेटिंग 55 टक्के राहिले असून हे सर्वाधिक ठरले आहे.
याचप्रकारे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांचे स्वीकृती रेटिंग 24 टक्के राहिले आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे अप्रूवल रेटिंग नकारात्मक राहिले आहे. याचाच अर्थ त्यांचे समर्थन करणाऱयांच्या तुलनेत विरोध करणाऱयांची संख्या अधिक आहे. संकेतस्थळानुसार भारतात सर्वेक्षणादरम्यान नमुन्यांची संख्या 2126 राहिली आहे. तर यात त्रुटीची शक्यता 2.2 टक्के आहे.









