ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील 2 कोटी 90 लाख महिला आधुनिक गुलामगिरीच्या शिकार बनल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
आधुनिक गुलामगिरी म्हणजे आर्थिक लाभासाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेणे होय, असे ‘वॉक फ्री’ या गुलामगिरीविरोधी संघटनेचे सहसंस्थापक ग्रेस फॉरेस्ट यांनी म्हटले आहे. कर्जबाजारीपणामुळे करावी लागणारी मोलमजुरी आणि कौटुंबिक गुलामगिरीसारख्या जाचक वागणूकीला महिला आणि मुलींना सामोरे जावे लागत आहे.
वॉक फ्री, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना यांनी एकत्रित गुलामगिरीबाबत अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार, 99 टक्के महिला या लैंगिक छळवणूक, 84 टक्के जबरी विवाह, 58 टक्के वेठबिगारीच्या बळी ठरल्या आहेत. कोरोनामुळे आधुनिक गुलामगिरीत आणखी भर पडली असून, बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे.
जगभरातील 130 महिला आणि मुलींमागे एकीला आधुनिक गुलामगिरीमध्ये रहावे लागते आहे. या गुलामगिरीतील स्त्रियांची एकूण संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे.









