200 भारतीय वंशीय विविध देशांच्या सत्तेत सामील-15 देशांमध्ये पोहोचले सत्तेच्या शिखरापर्यंत
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
भारतीय वंशाच्या 200 हून अधिक व्यक्ती अमेरिका, ब्रिटनसह जगातील 15 देशांमध्ये नेतृत्वाच्या स्थानी पोहोचल्या आहेत. भारतीय समुदायादरम्यान काम करणाऱया अमेरिकेतील एका संघटनेने या दिग्गज भारतीय व्यक्तिमत्वांची यादी तयार केली आहे. 2021 इंडायस्पोरा लिडर्स लिस्ट अनेक शासकीय संकेतस्थळे आणि सार्वजनिक व्यासपीठांवर उपलब्ध माहितीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रातील भारतीय वंशाच्या सामुदायिक नेतृत्वाच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे.
भारतीय वंशाचे 200 नेते जगातील 15 देशांमध्ये सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत. यातील 60 हून अधिक नेते मंत्रिमंडळात सामील आहेत. अमेरिकेची पहिली महिला उपाध्यक्ष भारतीय वंशाची असणे गर्वाची बाब असल्याचे उद्गार सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक आणि गुंतवणुकदार एम. आर. रंगास्वामी यांनी काढले आहेत.
महत्त्वाच्या पदांवर आरुढ
इंडायस्पोराच्या यादीत अनेक राजनयिक, खासदार, मध्यवर्ती बँकेचे प्रमुख, तसेच वरिष्ठ नागरी अधिकारी आहेत. या सर्वांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. 2021 च्या इंडायस्पोरा गव्हर्नमेंट लिडर्स यादीत सामील होणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. अमेरिकेत दीर्घकाळापर्यंत खासदार राहिलेला मी भारतीय-अमेरिकन आहे. अमेरिकेचे जीवन आणि समाजाचा अविभाज्य भाग झालेल्या भारतीय अमेरिकन समुदायावर गर्व असल्याचे अमेरिकेच्या हाऊस फॉरेन अफेयर्स उपसमितीचे अध्यक्ष खासदार एमी बेरा यांनी म्हटले आहे.
देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान
प्रतिनिधित्व करत असलेल्या देशांच्या प्रगतीत भारतीय वंशाच्या नेत्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजाच्या मोठय़ा वर्गासाठी सामाजिक न्यायाला चालना देणे आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग तयार करणाऱया शासकीय धोरणात या नेत्यांचे महत्त्वाचे योगदान असते, असे उद्गार फिजीच्या शिक्षण, वारसा आणि कला मंत्री रोजी अकबर यांनी काढले आहेत.
58.7 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व
विदेश मंत्रालयानुसार जगभरात 3.2 कोटीहून अधिक भारतीय वंशाचे लोक असून या हिशेबाने विदेशात भारतीयांचा समुदाय सर्वात मोठा आहे. इंडायस्पोराकडून प्रसिद्ध विधानानुसार यादीत सामील गव्हर्नमेंट लिडर्स 58.7 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करतात.
यादीत तंत्रज्ञही सामील
इंडायस्पोराच्या यादीत सामील दिग्गजांमध्ये सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये भारतातून गेलेल्या लोकांसह तेथे जन्मलेले तंत्रज्ञही सामील आहेत. भारतातून प्रारंभी विदेशात गेलेल्या लोकांमध्ये बहुतांश जण रोजगाराच्या शोधात बाहेर पडले होते. तर पुढील पिढीचे लोक शिक्षणासाठी गेले होते. 2021 च्या इंडायस्पोरा लिडर्स यादीत अमेरिका, कॅनडा, त्रिनिदाद अँड टोबॅगो, गयाना, सूरीनाम, आयर्लंड, ब्रिटन, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, मलेशिया, सिंगापूर, फिजी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या नेत्यांची नावे आहेत.
नीरा टंडन यांचाही समावेश
भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या टॉप लिडरशिप यादीत कमला हॅरिस यांच्यासह नीरा टंडन यांचे नाव आहे. टंडन व्हाईट हाऊसमध्ये व्यवस्थापकीय तसेच अर्थसंकल्पीय संचालिका आहेत. यादीत एमी बेरा (कॅलिफोर्निया), प्रमिला जयपाल (वॉशिंग्टन), आर. ओ. खन्ना (कॅलिफोर्निया), राजा कृष्णमूर्ती (इलिनोय) यासारख्या खासदारांची नावेही आहेत.









