ईस्कॉन मंदिरात भजन, प्रवचन, किर्तन आदी कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ (ईस्कॉन) बेळगावच्यावतीने आयोजित जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाची शुक्रवारी महाप्रसादाने सांगता झाली. बेळगावसह विविध भागातून आलेल्या ईस्कॉनच्या हजारो भक्तांनी यंदाच्या महोत्सवात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला. गुरुवारी शहरात 22 वी रथयात्रा उत्साहात पार पडली. शुक्रवारी टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर आवारात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ईस्कॉनचे ज्ये÷ संन्यासी प. पू. रामगोविंद महाराज, प. पू. प्रभोदानंद सरस्वती महाराज आणि ईस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची सकाळी 9 वा. भागवत प्रवचने झाली.
दुपारी विश्वशांती आणि सर्वांच्या सुख समाधानासाठी वैष्णव यज्ञ करण्यात आला. ईस्कॉनचे माधव चरण प्रभूजी यांच्या पौरोहित्याखाली झालेल्या या वैष्णव यज्ञ कार्यक्रमात ईस्कॉनचे अनेक भक्त सहकुटुंब सहभागी झाले होते. सायंकाळच्या सुमारास ज्ये÷ संन्याशांची प्रवचने, नाटय़लीला, भजन, कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. महोत्सवानिमित्त ईस्कॉन मंदिराच्या पाठीमागील बाजूस उभारलेल्या विविध स्टॉल्सवर सेंद्रीय शेतींची उत्पादने, खाद्यपदार्थ आणि ईस्कॉनच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी कृष्णभक्त उपस्थित होते. सायंकाळी 7 नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप झाले. शुक्रवारी रथयात्रा महोत्सवाची सांगता झाली.









