महारसोई ‘रोसाघरा’तील 40 चुली फोडल्या ः पोलिसांकडून तपास सुरू
@ वृत्तसंस्था/ पुरी
ओडिशाच्या जगन्नाथपुरी मंदिराच्या महारसोईतील (भव्य स्वयंपाकघर) 40 चुली फोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सकल धूप प्रसाद तयार करण्यासाठी रसोईघर उघडण्यात आल्यावर रविवारी सकाळी हा प्रकार समोर आला. पोलीस आणि प्रशासन याप्रकरणी तपास करत आहे. या घटनेनंतर महाप्रसाद मिळविण्यास काहीशी समस्या येणार असली तरीही चुलींची दोन दिवसात दुरुस्ती करण्यात येणार आहे.
रोसाघरच्या 40 चुली फोडण्यात आल्याने भगवान जगन्नाथ मंदिराच्या परंपरांवर फारसा परिणाम झाला नसला तरी रविवारी सकाळी अर्पण होणारा ‘सकल धूप’ अर्ध्या तासाच्या उशिराने तयार झाला. पुरीचे जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांच्यानुसार याप्रकरणी तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच दोषींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.
सेवादारांवर संशय?
मंदिर प्रशासनानुसार या घटनेत सेवादारांचा (मंदिरात सेवा करणारे) हात असू शकतो, कारण केवळ सुआरा (स्वयंपाक करणारे)लाच रोसाघरात प्रवेश मिळतो. याचमुळे शनिवारी रात्रीच कुणीतरी पारंपरिक भोजन तयार केल्यावर चुली फोडल्या असण्याची शक्यता आहे. परंतु या घटनेमुळे मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सातही दिवस खुले मंदिर
जानेवारी महिन्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेदरम्यान 21 दिवसांपर्यंत बंद राहिल्यावर 12 व्या शतकातली मंदिर 21 फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. पूर्वी मंदिर सोमवार ते शनिवार सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खुले असायचे. परंतु 20 मार्चपासून रविवारीही मंदिरात दर्शनासाठी भाविकांना जाता येत आहे.
रोसाघर…
– रसोई घरात 32 खोल्या असून ते एक एकरमध्ये फैलावलेले आहे.
– दरदिनी सुमारे 300 क्विंटल भात तयार केला जातो, याला महाप्रसाद म्हटले जाते.
– रोसाघरमध्ये 240 चुली असून ज्यावर अन्न शिजविण्याची अनुमती केवळ सुआरा (आचारी) यांनाच असते.
– या सर्व चुली आणि प्रसादासाठीची भांडी मातीची असतात.
– रोसाघरमध्ये 400 आचारी अन् त्यांचे 200 सहाय्यकच महाप्रसाद तयार करू शकतात.
– महाप्रसाद पूर्णपणे शाकाहारी असतो, यात लसूण, कांदा, बटाटा, टॉमेटो, दुधी भोपळा, कोबीचा वापर होत नाही.
– महाप्रसाद केवळ रोसाघरमध्ये असलेल्या दोन विहिरी गंगा-यमुनाच्या पाण्याद्वारे तयार केला जातो.









