‘तरुण भारत’ इफेक्ट : गतापवाडीकरांनी मानले ‘तरुण भारत’चे आभार
सातारा / प्रतिनिधी :
गटाराचे पाणी पिण्याच्या पाईपमध्ये गेल्याने जगतापवाडीत दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्याबाबत निवेदन देऊन फोन करून ही प्राधिकरण आणि पालिका लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच प्राधिकरणाच्या अभियंता पल्लवी मोठे खडबडून जाग्या झाल्या. पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांच्यासह प्राधिकरणाच्या अभियंता मोठे यांनी जगतापवाडीला भेट दिली. हादगे यांनी संबंधितांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना निर्मळ, स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यावेळी ‘तरुण भारत’चे नागरिकांनी आभार मानले.
शाहूनगरातील जगतापवाडीच्या गटारचे काम तसेच अर्धवट राहिले आहे. ते अतिक्रमणाच्या तक्रारीमुळे राहिल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, याच अपूर्ण गटारातून पाण्याची पाईपलाईन जात असल्याने त्या गटाराचे पाणी पिण्याच्या पाईप लाईनमध्ये जात असल्याने दूषित पाणी पुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून होत आहे, अशी तक्रार जगतापवाडीतील नागरिकांनी केली होती. तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उंटावरून शेळ्या हाकण्याचा कार्यक्रम करत होते. अभियंता मोटे या कामात मोठेपणा दाखवण्याऐवजी त्या पत्रकारांना खोटी माहिती देऊन बोळवण करण्यात पटाईत असल्याचा प्रकार तरुण भारतच्या निदर्शनास आला. तरुण भारतकडे नागरिकांनी कैफियत मांडताच सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे मोठे या खडबडून जाग्या झाल्या.
कार्यतत्पर पाणी पुरवठा सभापती सीता हादगे या जगतापवाडी येथे सकाळी पोहचल्या. त्यांच्यासोबत पाणीपुरवठा विभागाचे संदीप सावंत, शहर विकासाचे प्रकाश राजेशिर्के, आरोग्य विभागाचे शैलेश आस्टेकर आदी उपस्थित होते. त्यांना नागरिकांनी समस्या कथन केल्या.सभापती हादगे यांनी सर्व म्हणणे ऐकून घेऊन पाणी पुरवठा विभागास तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
मोटे चांगल्याच हडबडल्या
अभियंता मोटे यांचे काम सगळ्यांना चांगलेच ज्ञात आहे. त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना कामे देऊन आवाज गप्प करतात. त्यामुळे नागरिकांना किती जरी समस्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.असे अनेकदा घडले असून त्यांच्या कारभाराबाबत ‘तरुण भारत’ने रोख ठोक वृत्त प्रसिद्ध करताच त्या हडबडून जाग्या झाल्या.अन् काम कसल्याही परिस्थितीत करण्याची ग्वाही त्यांनी दिली, असल्याचे नागरीकांनी सांगितले.









