110 वर्षीय महिलेपर्यंत पेन्शन पोहोचविण्यासाठी ओलांडतो डोंगर
स्मार्टफोन आणि ईमेलने पत्रांचे महत्त्व कमी केले असले तरीही दुर्गम भागांमध्ये आजही पोस्टाद्वारेच पेन्शन किंवा आवश्यक कागदपत्रे पोहोचविली जातात. तामिळनाडूच्या एका पोस्टमास्तरने स्वतःच्या कर्तव्यभावनेद्वारे लोकांची मने जिंकली आहेत. 55 वर्षीय पोस्टमास्तर दर महिन्याच्या एका रविवारी ‘कलक्कड मुंडनथुराई टायगर रिझर्व्ह जंगला’चा एक दिवस प्रवास करतो, या प्रवासाद्वारे तो 110 वर्षीय महिलेला 5 महिन्यांपूर्वी दिलेल्या शब्दाचे पालन करत आहेत.
पापनासम अप्पर डॅम ब्रँचचे के.एस. क्रिस्टुराजा यांना ही विशेष मोहीम सोपविण्यात आली होती. जिल्हाधिकारी व्ही. विष्णू यांनी व्याघ्र प्रकल्पातील इंजिकुझी आदिवासी वस्तीच्या दौऱयादरम्यान 110 वर्षीय कुट्टियाम्माल यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकाऱयांनी वृद्ध महिलेला 1 हजार रुपये मासिक वृद्धापकाळ पेन्शनचे आश्वासन दिले होते. पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून महिलेपर्यंत पेन्शन पोहोचविण्याचा निर्देश त्यांनी अधिकाऱयांना दिला होता.
25 किलोमीटरची पायपीट

क्रिस्टूराजा यांना प्रथम नौकेद्वारे 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यानंतर सुमारे 10 किलोमीटरची पायपीट करावी लागते. पण धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर त्यांना 25 किलोमीटरची पायपीट करावी लागते. या प्रवासादरम्यान अनेकदा त्यांना जीवघेण्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते.
दिवसभराचा प्रवास
प्रवासात पूर्ण दिवस लागतो, याचमुळे पोस्ट मास्तर रविवारीच पेन्शन पोहोचविण्यासाठी जातात. सकाळी 7 वाजता हा प्रवास सुरू करतो. जंगलात नदीकाठावर न्याहरी केल्यावर वस्तीला लागून असलेल्या मंदिरात पोहोचतो, तेथील नदीत स्नान केल्यावर कुट्टियाम्माल यांच्या घरी जात असल्याचे क्रिस्टुराजा यांनी म्हटले आहे. कुटियाम्माल यांना रक्कम सोपविल्यावर आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्यावर ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नौकेजवळ पोहोचतात.
जंगलातून वाटचाल
क्रिस्टुराजा यांनी ‘एक्स्ट्रा डिपार्टमेंटल डिलिव्हरी एजंट’ म्हणून 1997 मध्ये नोकरीस प्रारंभ केला होता. ते जंगलातील अगस्तियार कानी वस्तीचे रहिवासी आहेत. पेन्शन मिळाल्यावर वृद्ध महिलेच्या मनाला शांतता मिळत असल्याचे त्यांच्या नातेवाईकाने म्हटले आहे.









