आमदार रवी नाईक यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनमुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांबरोबरच छोटेमोठे व्यावसाय करणाऱया लोकांचा रोजगार अडचणित आला आहे. त्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक आधार योजना जाहीर करावी. राज्यातील टॅक्सी चालक, मोटरसायकल पायलट, रिक्षा चालक, तसेच पर्यटन व इतर व्यवसायावर अवलंबून असलेले वाहतूकदार व छोटय़ा व्यावसायिकांना आर्थिक आधाराची आज गरज आहे. सरकारने अशी योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केली आहे.
त्यासंबंधीचे लेखी निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आमदार रवी नाईक यांनी सादर केले आहे. राज्याच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असलेला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. खाण व्यवसाय तर यापूर्वीच बंद झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून राज्याला ज्यादा निधी मिळणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे असंघटीत क्षेत्रातील लाखो लोक आर्थिक विवंचनेत सापडले असून या परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे व राज्य सरकारने त्यांना आर्थिक आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे रवी नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
पर्यटन बंद झाल्याने, खाणी सुरु होणे गरजेचे
सन 2012 मध्ये राज्यातील खाणी बंद झाल्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या 1 लाखाहून अधिक लोकाना बेरोजगार व्हावे लागले. आता लॉकडाऊनमुळे त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. खाण पट्टय़ातील अनेक कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडून गोव्याला आपत्तकालीन आर्थिक साहाय्य म्हणून 177 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. हा निधी अत्यंत तुटपुंजा असून किमान 500 ते 600 कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे रवी नाईक म्हणाले. गोव्याच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असलेला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थंडावल्याने त्यातून बाहेर येण्यासाठी खाण उद्योग पूर्ववत सुरु होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारकडे जलद गतीने पाठपुरावा करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
चेकनाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करा
गोवा राज्य कोरोनामुक्त झाले असले तरी सरकारला निर्धास्त राहता येणार नाही. शेजारील बेळगाव व इतर भागामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सीमांवर कडक बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. कर्नाटक राज्यातून भाजी, दूध व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱया वाहनांची कसून तपासणी होणे गरजेचे आहे. भाजीच्या वाहनांमधून परप्रांतीय लोकांची वाहतूक केली जात असल्याचे वृत्त आहे. काही लोक रानातून आडवाटांनी गोव्यात प्रवेश करीत आहेत. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.









