प्रतिनिधी / सातारा :
हाफ मर्डरच्या केसमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी हजर न राहता 14 वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसंत निवृत्ती सूर्यवंशी, (वय 52, रा. हेळगाव, ता. कराड) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर तो 14 वर्षापासून न्यायालयातील कामकाजासाठी हजर न राहता फरार होता. त्यामुळे त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. तरीदेखील तो सापडत नसल्याने न्यायालयाने त्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी वसंत सूर्यवंशी याची माहिती मिळवून दि. 11 नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.