कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या पाच जिल्हय़ांमधील विधानसभेच्या 44 जागांसाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 76.16 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत असल्याने अखेरच्या एक-दीड तासात झालेल्या मतदानाअंती हा आकडा 80 टक्क्यांच्या वर जाण्याचे संकेत मिळत आहेत. या टप्प्यातही नेहमीप्रमाणे महिला आणि तरुण मतदारांचा वाढता उत्साह दिसून येत होता.
विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शनिवारी राज्यातील हावडा, दक्षिण चोवीस परगाणा, हुगळी हे दक्षिण बंगालमधील जिल्हे, तसेच अलिपूरदुआर आणि कूचबिहार या उत्तर बंगालमधील जिल्हय़ांमध्ये शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 अशी होती. एकंदर 15,940 केंद्रावर मोठय़ा प्रमाणात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली. काही भागात झालेल्या हिंसाचारामुळे या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागले आहे.
राज्याचे शिक्षण मंत्री पार्था चॅटर्जी (बेहला पश्चिम), माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी (शिबपूर), केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (टॉलीगंज), रत्ना चॅटर्जी (बेहला पूर्व) अशा अनेक प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले राजीब बॅनर्जी दामजूरमधून तर भाजपच्या खासदार आणि अभिनेत्या लॉकेट चॅटर्जी चिनसुरा मतदारसंघांमधून आपले भवितव्य आजमावत आहेत.









