मोईन अलीची अष्टपैलू कामगिरी
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
हंगामी कर्णधार व सामनावीर मोईन अलीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने यजमान विंडीजविरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने विंडीजचा 34 धावांनी पराभव केला.
या मालिकेतील या चौथ्या सामन्यात शनिवारी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 6 बाद 193 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकांत 5 बाद 159 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 34 धावांनी गमवावा लागला. आता या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी खेळविला जात आहे.
या चौथ्या सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व अष्टपैलू मोईन अलीकडे सोपविण्यात आले होते. दुखापतीमुळे या सामन्यात कर्णधार मॉर्गन खेळू शकला नाही. मोईन अलीने 28 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांसह 63 धावा झळकविल्या. विंडीजच्या होल्डरच्या एका षटकात मोईन अलीने सलग चार षटकार मारले. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जेसन रॉयने 42 चेंडूत 52 धावा झळकविल्या. रॉयला तीन धावांवर जीवदान मिळाले होते. 9 षटकाअखेर इंग्लंडने 1 बाद 80 धावापर्यंत मजल मारली होती. मोईन अलीच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने शेवटच्या तीन षटकांत 59 धावा झोडपल्या. इंग्लंडच्या विन्सेने 34 धावा जमविल्या. मोईन अलीने अकिल हुसेनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून इंग्लंडचे शतक फलकावर लावले. त्यानंतर त्याने जेसन होल्डरच्या एका षटकांत सलग चार षटकार ठोकल्याने इंग्लंडने 150 धावांचा टप्पा ओलांडला. विंडीजतर्फे होल्डरने 44 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजने आपल्या डावाला दमदार सुरूवात करताना पहिल्या सहा षटकांत बिनबाद 56 धावा जमविल्या. मोईन अलीने मेयर्सला 40 तर बेंडॉन किंगला 26 धावांवर बाद केले. रशीदने रोवमन पॉवेलला बाद केल्याने विंडीजची स्थिती 3 बाद 78 अशी झाली. निकोलस पुरन आणि होल्डर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडच्या जॉर्डनने डावातील 17 वे षटक टाकताना केवळ 7 धावा देत होल्डरला सीमारेषेवर झेलबाद केले. होल्डरने 36 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजच्या फलंदाजांना उर्वरित धावा जमविता आल्या नाहीत. विंडीजने 20 षटकांत 5 बाद 159 धावा जमविल्या. इंग्लंडच्या आदिल रशीद आणि मोईन अली यांच्या अचूक गोलंदाजीमुळे विंडीजला पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या मोईन अलीने 28 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 20 षटकांत 6 बाद 193 (मोईन अली 63, जेसन रॉय 52, व्हिन्से 34, जेसन होल्डर 3-44), विंडीज 20 षटकांत 5 बाद 159 (मेयर्स 40, होल्डर 36, मोईन अली 2-28).









