सध्यस्थितीचा आढावा घेऊन अहवाल तयार : काम मार्गी लागण्यास आणखी सहा महिने
प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यासाठी कामकाज सुरू झाले आहे. सध्या ग्राहक सर्वेक्षण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून एल ऍण्ड टी कंपनीने सद्यस्थितीचा आढावा घेऊन अहवाल तयार केला आहे. मात्र, या योजनेचे प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्यास विलंब लागण्याची शक्मयता आहे.
शहरात 10 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. आता उर्वरित 48 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. 24 तास पाणीपुरवठा विस्तारीकरणाचे काम एल ऍण्ड टी कंपनीला दिले आहे. त्यामुळे कंपनीने कामकाज सुरू केले असून शहर आणि उपनगरांतील ग्राहकांची मते जाणून घेण्याचे काम करण्यात येत आहे.
सध्या ग्राहक सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घरोघरी जावून घरातील सदस्यांची संख्या, पाण्याचा वापर आणि विविध माहिती घेण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या आधारे नळ जोडण्या आणि पाण्याचा वापर दररोज किती होणार आहे, याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर जलवाहिन्या घालण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या जलवाहिन्या, जलकुंभ, पाणीपुरवठा करणाऱया पंपांची क्षमता आदी माहिती घेण्यात येत आहे.
मंजुरीनंतर कामकाजास प्रारंभ
सद्यस्थितीचा आढावा घेऊन अहवाल तयार करण्यात येत आहे. यापैकी किती जलवाहिन्यांचा आणि जलकुंभांचा वापर 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत होऊ शकतो, याची चाचपणी करण्यात येणार आहे. विविध आराखडे तयार करण्यात आले असून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कामकाजास प्रारंभ होणार आहे. अद्यापही सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने या योजनेचे काम प्रत्यक्षात मार्गी लागण्यास आणखी सहा महिन्यांच्या अवधीची शक्मयता आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा मंडळाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाल्यानंतर शहर पाणी पुरवठय़ाची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीकडे राहणार आहे.









