प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यात चोरट्यांनी एका फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून 62 हजार 356 रुपयांची रोकड लंपास केली. तर दुसऱ्या घटनेत एका मंदिरातील 50 हजार रुपयांच्या मुर्ती चोरुन नेण्यात आल्या. याबाबत सातारा व शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी रात्रीच्या वेळी साताऱ्यातील बॉम्बे रेस्टारंट परिसरातील म्हावशे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या उत्तेकर आर्केडमधील एल. एन. टी. फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरटयांनी कार्यालयाच्या लॉकरमधील 62 हजार 356 रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत कंपनीचे कर्मचारी अतिक मैनुद्दीन मणेर (वय 28 रा. स्टेट बँकेजवळ, कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या चोरीचा अधिक तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेतील जुन्या घरात असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यातील 50 हजार रुपये किंमतीच्या गोपाळ कृष्णाच्या दोन मूर्ती, अंबाबाई देवीच्या दोन पितळी मूर्ती, माता जोगेश्वरी देवीची मूर्ती, पितळी घंटा, पंचपाळी असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना दि. 1 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सविता दीपक दीक्षित (रा. प्रथमेश पार्क, मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी एकाबाबत संशय व्यक्त केला असून या चोरीचा अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.









