वृत्तसंस्था / लंडन
2020-21 च्या महिलांच्या एफए चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद चेल्सीने पटकाविले. रविवारी विंब्लेच्या स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात चेल्सी महिला फुटबॉल संघाने अर्सेनलचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला,.
या अंतिम सामन्यात प्रेन किरबायने दुसऱयाच मिनिटाला चेल्सीचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत चेल्सी क्लबने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. या सामन्यातील उत्तरार्धात सॅम केरने दोन गोल नोंदवून अर्सेनलचे आव्हान संपुष्टात आणले. 2021 च्या फुटबॉल हंगामात इमा हेसच्या चेल्सी फुटबॉल संघाने तीन फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत. याआधी लीग चषक आणि महिलांची सुपरलीग स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. चेल्सीने आतापर्यंत तीनवेळा ही स्पर्धा यापूर्वी जिंकली आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. रविवारी झालेल्या अंतिम सामन्याला सुमारे 41 हजार शौकिन उपस्थित होते. चेल्सीच्या सॅम केरची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.









