आयपीएल टी-20 : धोनीसेनेने विजयाची संधी दवडली, दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा विजय,
पृथ्वी शॉचे धमाकेदार अर्धशतक
वृत्तसंस्था / दुबई
पृथ्वी शॉचे (43 चेंडूत 64) धमाकेदार अर्धशतक व गोलंदाजांच्या नियंत्रित, भेदक माऱयामुळे दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स संघाला 44 धावांनी सहज नमवण्याचे धारिष्टय़ दाखवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकात 3 बाद 175 धावा जमवल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकात 7 बाद 131 धावांसह विजयापासून बरेच कोस दूर रहावे लागले. दिल्लीचा हा सलग दुसरा विजय असून या विजयासह ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचले.
चेन्नईतर्फे केवळ फॅफ डय़ू प्लेसिसनेच (35 चेंडूत 43) संघर्षमय खेळ साकारला. त्याचा अपवाद वगळता बहुतांशी फलंदाजांनी हाराकिरीच केली. तुलनेने 176 धावांचे आवाक्यातील आव्हान समोर असताना चेन्नईची सुरुवात आश्वासक अशी अजिबात नव्हती आणि शेवटपर्यंत या परिस्थितीत किंचीतही बदल झाला नाही. टेस्ट स्पेशालिस्ट म्हणूनच अधिक ओळखल्या जाणाऱया मुरली विजयने या लढतीतही पुन्हा एकदा निराशा केली. अनुभवी शेन वॅटसनने 16 चेंडूत 14 धावा जमवताना काही आक्रमक फटके लगावले. पण, याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यात त्याला अजिबात यश लाभले नाही.
पुण्याचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड येथेही चमक दाखवू शकला नाही. त्याला 5 धावांवर धावचीत होत परतावे लागले. केदार जाधवने नोर्त्जेच्या गोलंदाजीवर पायचीत होण्यापूर्वी 21 चेंडूत 26 धावा जोडल्या. एका बाजूने ठरावीक अंतराने गडी बाद होत असताना अनुभवी प्लेसिसने एक बाजू लावून धरली होती आणि त्यानंतर धोनी क्रीझवर आल्याने या जोडीकडूनच चेन्नईला अधिक अपेक्षा होती. मात्र, शेवटच्या 3 षटकात 66 धावांची आवश्यकता असल्याने आव्हानाचा डोंगरही तितकाच मोठा होता. अर्थात, रबाडाच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात प्लेसिसने यष्टीमागे पंतकडे झेल दिला आणि चेन्नईला आणखी एक जबरदस्त धक्का सोसावा लागला.
धोनी-जडेजा ही जोडी मैदानात असताना विजयाचे लक्ष्य चेन्नईच्या आवाक्यातून बरेच बाहेर गेले आणि त्यानंतर दिल्ली सरस ठरण्याची केवळ औपचारिकता बाकी होती. पुढे हे दोघेही अनुभवी फलंदाज लागोपाठ बाद झाले आणि दिल्लीने 44 धावांनी विजय संपादन केला.
पृथ्वीचे अर्धशतक
पीयूष चावला (2-33), सॅम करणसह (1-27) बहुतांशी सहकाऱयांनी समयोचित मारा केल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित 20 षटकात 3 बाद 175 धावांवर रोखले. पृथ्वी शॉची 43 चेंडूतील 64 धावांची झुंजार खेळी दिल्लीच्या डावातील ठळक वैशिष्टय़ ठरले.
पृथ्वी शॉशिवाय, अनुभवी शिखर धवनने 27 चेंडूत 35 तर ऋषभ पंतने 25 चेंडूत नाबाद 37 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यर 22 चेंडूत 26 धावांवर बाद झाला. गोलंदाजीच्या आघाडीवर चावला व सॅम करण यांनी काटेकोर मारा केला. अनुभवी रविंद्र जडेजाला मात्र 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना एकाही बळीशिवाय 44 धावा मोजाव्या लागल्या.
या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने धवन व पृथ्वी शॉ यांच्या फटकेबाजीमुळे पहिल्या 10 षटकात एकही गडी न गमावता 88 धावा उभारल्या होत्या. पृथ्वीने जडेजाच्या त्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत 36 चेंडूत नाबाद 56 धावांपर्यंत मजल मारली तर धवन 24 चेंडूत 30 धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर 11 व्या षटकात शिखर धवन स्वतःच्या चुकीने पायचीत झाला आणि ही जोडी फुटली. फिरकी गोलंदाज पीयूष चावलाच्या या षटकात चौथ्या चेंडूवर धवनने रिव्हर्स स्वीपवर चौकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा अंदाज पूर्ण चुकीचा ठरला आणि फटक्याचे टायमिंग चुकल्यानंतर चेंडू थेट पायावर आदळला. त्यानंतर ऋषभ पंतला आल्याआल्याच पायचीत अपीलला सामोरे जावे लागले. पण, पंचांनी अपील फेटाळून लावले होते.
युवा फलंदाज पृथ्वी शॉने प्रत्येक चेंडू मेरिटनुसार खेळत समयोचित फटकेबाजीही केली. पण, धवन परतल्यानंतर शॉ देखील फार काळ तग धरु शकला नाही. यष्टीरक्षक धोनीने शिताफीने यष्टीचीत केल्यानंतर शॉची निराशा होणे साहजिक होते. तो तंबूत परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर व ऋषभ पंत या जोडीने धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला. या उभयतांच्या भागीदारीत चौकार-षटकाराची फारशी आतषबाजी नसली तरी स्ट्राईक रोटेट करण्यावर त्यांचा कमालीचा भर राहिला. शिताफीने एकेरी-दुहेरी धावा घेत त्यांनी संघाला शक्य तितक्या सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. अखेर 19 व्या षटकात सॅम करणने धोनीकरवी अय्यरला झेलबाद करत ही जोडी फोडली. अय्यरच्या 26 चेंडूतील 22 धावांच्या खेळीत एका चौकाराचा समावेश राहिला. हॅझलवूडच्या शेवटच्या षटकात दिल्लीने 3 चौकारांसह 14 धावा जमवल्या.