वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूत पालिका निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली आहे. राज्यात सत्तारुढ असलेला द्रमुकने ग्रेटर चेन्नई महापालिकेत स्वबळावर बहुमत मिळविले आहे. तर चेन्नई महापालिका निवडणुकीत भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. भाजपने तामिळनाडूतील पालिका निवडणुकांमध्ये 12 हून जागा जिंकून स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले आहे. नागरकोइल पालिकेच्या 4 प्रभागांमध्ये भाजपने विजय मिळविला आहे. तसेच चेन्नईतील काही प्रभागांमध्ये भाजप दुसऱया स्थानावर राहिला आहे.
चेन्नईतील एका जागेवर मिळालेला विजय हा भाजपचे मनोबळ वाढविणारा आहे. द्रमुकला 104 जागांहून अधिक ठिकाणी विजय मिळाल्याने त्याला अन्य कुणाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. काँग्रेसला 7 तर भाकपला 1 तर माकपला 2 जागांवर यश मिळाले. दुसरीकडे अण्णाद्रमुकचे 12 नगरसेवक निवडून आले आहेत. शहरात एकूण 200 प्रभाग आहेत.
अण्णाद्रमुकचा बालेकिल्ला राहिलेल्या कोइम्बतूरमध्येही द्रमुकने आघाडी घेतली आहे. द्रमुक आघाडी तेथेही सत्तेवर येणार आहे. मदुराई महापालिकेतही द्रमुकची सरशी झाली आहे.









