वृत्तसंस्था/ मुंबई
2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी बलाढय़ चेन्नई सुपरकिंग्स संघाचे सराव शिबीर मुंबईत सुरू झाले असून अष्टपैलू सुरेश रैना, रविंद्र जडेजा या शिबिरात दाखल झाले आहेत. जडेजाला यापूर्वी झालेली दुखापत आता बरी झाली असल्याने त्याने या शिबिरात दाखल घेण्याचा निर्णय घेतला तर सुरेश रैनानेही या हंगामासाठी आपली उपलब्धता जाहीर केली. रैनाने मागील हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला होता.
गेल्या जानेवारीत सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाचे हाड मोडल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीमुळे अष्टपैलू जडेजाला भारतीय संघात अलिकडेच्या बऱयाच मालिकामध्ये खेळता आले नाही. इंग्लंडविरूद्ध तिन्ही मालिका जडेजाला हुकल्या. या दुखापतीतून बरे झाल्यानंतर जडेजाने अलिकडे बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या सरावाला प्रारंभ केला. जडेजा बेंगळूर येथून मुंबईत दाखल झाला आहे. कोरोना नियमामुळे आता जडेजाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन रहावे लागेल. आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तो उपलब्ध असेल, अशी आशा चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ के. विश्वनाथन यांनी व्यक्त केली. 24 मार्चपासून चेन्नई संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ झाला आहे. या संघाला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम सरावासाठी उपब्लध करून देण्यात आले आहे. 10 एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सलामीचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई संघाचे या स्पर्धेतील चार सामने मुंबईत त्यानंतर चार सामने दिल्लीत त्यानंतर तीन सामने बेंगळूरमध्ये खेळविले जातील.