तुरुंगवासाचा धोका – ऑक्सफोर्ड विद्यापीठही संशयाच्या भोवऱयात
वृत्तसंस्था/ .लंडन
ब्रिटनमध्ये चीनसाठी प्राध्यापकांनीच हेरगिरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनच्या 20 विद्यापीठांमधील सुमारे 200 प्राध्यापक चीनची मदत केल्याप्रकरणी संशयाच्या भोवऱयात सापडले आहेत. या प्राध्यापकांवर आता तुरुंगवारी करण्याची वेळ येऊ शकते. या प्राध्यापकांनी चीनला व्यापक विनाशाची शस्त्रास्त्रs निर्माण करण्यास मदत केली आहे का यासंबंधी गुप्तचर अधिकारी तपास करत आहेत. तर प्रतिष्ठित ऑक्सफोर्ड विद्यापीठही वादग्रस्त चिनी कंपनीकडून 7 लाख पौंडची देणगी प्राप्त करून वादात सापडले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा कायदा तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन या प्राध्यापकांनी केले आहे का याचा तपास आता सुरू आहे. हेरगिरीच्या या प्रकरणात आता ब्रिटनमधील अनेक प्रख्यात विद्यापीठांसह 20 संस्था अडचणीत आल्या आहेत. या संस्थांनी निर्यात नियंत्रण आदेश 2008 चा उल्लंघन केल्याचा संशय आहे.
विमान, क्षेपणास्त्र, सायबर अस्त्र
सैन्य आणि सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील क्षेत्रातील माहिती शत्रू देशाला पुरविण्यापासून रोखणे आणि बौद्धिक संपदा अधिकाराच्या संरक्षणासाठी निर्यात नियंत्रण आदेश लागू करण्यात आला होता. ब्रिटनच्या प्राध्यापकांनी विमान, क्षेपणास्त्र संरचना आणि सायबर अस्त्राची माहिती चीनला पाठविली आहे. ब्रिटनचे अधिकारी आता या 200 संशयित प्राध्यापकांना नोटीस बजावण्याची तयारी करत आहेत.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाने चिनी सॉफ्टवेअर कंपनी टेनसेंटकडून 7 लाख पौंड देणगीच्या बदल्यात प्रतिष्ठित प्रोफेसरशिप ऑफ फिजिक्सचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सन 1900 पासून आतापर्यंत विद्यापीठात याला द वयकहेम चेयर ऑफ फिजिक्स या नावाने ओळखले जात होते. पण आता याला टेनसेंट-वयकेहम चेयर या नावाने ओळखण्यात येणार आहे. टेनसेंटचा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या गुप्त शाखेशी संबंध आहे.









