एस-400 क्षेपणास्त्रांचा पुरवठा स्थगित : हेरगिरी भोवली
वृत्तसंस्था/ मास्को
रशियाने चीनला मोठा झटका दिला आहे. रशियाने स्वतःच्या एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेच्या क्षेपणास्त्रांचा चीनला होऊ घातलेला पुरवठा रोखला आहे. जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱया या क्षेपणास्त्रांच्या पुरवठय़ावर बंदी घालण्याची घोषणा रशियाने केल्याची माहिती चीनच्या सोहू या वृत्तपत्राने दिली आहे.
रशियाने क्षेपणास्त्र पुरवठय़ाचा व्यवहार स्थगित केला आहे. तत्पूर्वी रशियाने चीनवर हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. सेंट पीटर्सबर्ग आर्क्टिक सोशल सायन्सेस अकॅडमीचे अध्यक्ष वालेरी मिट्को यांना चीनला गोपनीय सामग्री पुरविल्याप्रकरणी रशियात दोषी ठरविण्यात आले आहे. या घटनेमुळेच रशियाने एस-400चा व्यवहार स्थगित केल्याची चर्चा आहे.
तर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या महामारीविरोधी कार्यांमुळेच एस-400 क्षेपणास्त्रांचा पुरवठा रशियाकडून रोखण्यात आल्याचा दावा चीनने केला आहे. अशाप्रकारच्या शस्त्रास्त्रांचा व्यवहार जटिल प्रक्रिया असते. याचबरोबर शस्त्र वापरण्यासाठी कर्मचाऱयांना प्रशिक्षण घ्यावे लागते. या प्रशिक्षणासाठी सैनिकांना रशियात पाठवावे लागले असते, परंतु कोरोना महामारीच्या काळात हे अत्यंत धोकादायक असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.
स्वतःच्या आक्रमकतेमुळे अनेक देशांसोबत एकाचवेळी चीन संघर्ष करत असताना रशियाने हा पुरवठा रोखला आहे. लडाखमध्ये हिंसक झटापटीनंतर चीनचे भारताशी तणावपूर्ण संबंध आहेत. हाँगकाँग आणि दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिका, युरोपीय देशांसह जपान, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशियासोबतचे चीनचे संबंध ताणले गेले आहेत. अशा स्थितीत रशियाने एस-400 क्षेपणास्त्रांचा पुरवठा रोखल्याने चीनच्या चिंतेत भर पडणार आहे. रशियाच्या या निर्णयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.









