गाँग्झी विभागाच्या वुझाऊ शहरानजीक अपघात
बिजींग / वृत्तसंस्था
चीनमध्ये भीषण विमान अपघात झाला असून विमानातील सर्व 133 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अद्याप चीन सरकारने मृतांच्या संख्येसंबंधी माहिती दिलेली नाही. मात्र विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याने कोणीही जिवंत हाती लागण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा अपघात गाँग्झी विभागातील वुझाऊ शहराच्या नजीक डोंगराळ भागात सोमवारी सकाळी घडला. हे विमान चायना इस्टर्न बोईंगचे होते. ते युनान प्रांतातील कुनमिंगहून गाँग्झीच्या विभागातील एका औद्यागिक वसाहतीकडे निघाले होते. विमानात 123 प्रवासी आणि चालकासह 10 कर्मचारी होते.
अधिकृत घोषणा नाही
चीनच्या केंद्रीय प्रशासनाने रात्री उशीरापर्यंत या अपघाताची माहिती दिली नव्हती. तसेच त्यात किती जणांचे बळी पडले तेही स्पष्ट केले नव्हते. या विमानाचा उड्डाण क्रमांक एमयू 5735 असा होता. अद्याप विमानकंपनीनेही या अपघातावर भाष्य केलेले नाही. मात्र तो घडल्याचे स्पष्ट केले आहे.
तातडीने साहाय्यता
अपघाताचे वृत्त कळताच प्रशासनाने त्वरित तेथे साहाय्यता पथक नियुक्त केले. या पथकाने विमान पडलेल्या जागी जाऊन शोधकार्य सुरु केले आहे. विमान डोंगरमाथ्यावर आदळताच त्याला प्रचंड आग लागली. त्यामुळे सर्वत्र दाट धूर प्रसला आणि साहाय्यात कार्यात अडथळा निर्माण झाला होता. काही तासांमध्ये तो दूर करण्यात आला आणि नंतर साहाय्यता कार्य सुरळीत सुरु झाले.
सहा वर्षे उपयोगात
अपघातग्रस्त विमान चीनच्या कंपनीला 2015 मध्ये हस्तांतरित करण्यात आले होते. ते गेली 6 वर्षे उपयोगात होते. ते बोईंग 737 या प्रकारचे होते. आतापर्यंत किमान 12 लाख प्रवाशांची वाहतूक त्याने केली होती, असे स्पष्ट झाले आहे.
संपर्क तुटल्यामुळे
ग्वाँक्झी भागात या विमानाचा नियंत्रण मनोऱयाशी संपर्क तुटला, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. डोंगराळ भागात चालकाचे विमानावर नियंत्रण राहिले नाही, असेही बोलले जात आहे. या विमानाचा फ्लाईट डाटा रेकॉर्डर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो सापडल्यानंतर अपघाताच्या कारणांवर प्रकाश पडणार आहे.









