शांक्सी प्रांतात दुर्घटना : 35 जण जखमी
बीजिंग
चीनच्या शांक्सी प्रांतात एक रेस्टॉरंट जमीनदोस्त होऊन 29 जण ठार झाले आहेत. ढिगाऱयाखाली अनेक जण अद्याप अडकून पडलेले असू शकतात अशी भीती पोलीस तसेच बचावपथकाने व्यक्त केली आहे. बचावकार्यासाठी बीजिंग येथून एक विशेष पथक तेथे पोहोचले आहे. रेस्टॉरंटमध्ये अनेकजण वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत सामील झाले होते. यात अनेक मुले तसेच महिला देखील सामील होत्या. परंतु एकूण किती जण दुर्घटनेवेळी रेस्टॉरंटमध्ये हजर होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
रेस्टॉरंट अत्यंत चिंचोळय़ा जागेत असल्याने पोलीस तसेच बचावपथकाला तेथे यंत्रसामग्री नेण्यास मोठी मेहनत करावी लागली आहे. तसेच तेथे पाऊस पडत असल्याने बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. या दुर्घटनेत रेस्टॉरंटच्या मालकाचाही मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.









