अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता : लडाखमध्ये अतिदक्षता
लडाख, बीजिंग / वृत्तसंस्था
भारत आणि चीन यांच्यात लष्करी पातळीवर चर्चा सुरू असली तरीही अद्याप ठोस तोडगा निघत नसल्याने चीननेही आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भारताने राफेल यंत्रणा सज्ज केल्याचा धसका घेत चीनने काशगर हवाई तळावर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने एच-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चीनच्या पा पवित्र्यानंतर भारतानेही सावधगिरीच्या उपाययोजना सुरू केल्या असून लष्करासह हवाई दलालाही सतर्क केले आहे.
चीनने काशगर हवाई तळावर सहा शियान एच-6 बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. यापैकी दोन विमाने पेलोड म्हणजेच शस्त्रसज्ज असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. चीनची एच-6 बॉम्बर विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असल्याने दोन्ही देशातील तणाव वाढू शकतो. पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेले नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती कायम आहे.
उत्तराखंड सीमेजवळही चीनचे सैन्य तैनात
तसेच उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आता बटालियनची तैनाती केली आहे. लडाख क्षेत्राबाहेर झालेली ही पहिली तैनाती आहे. मागच्या काही आठवडय़ांपासून या भागात चिनी सैन्याच्या हालचाली दिसत होत्या. लिपूलेख पास, उत्तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या नियंत्रण रेषेजवळील भागांमध्ये चिनी सैनिकांची संख्या वाढल्याच्या वृत्ताला लष्करी अधिकाऱयांनीही दुजोरा दिला आहे.
चर्चेत तोडगा नाहीच
पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या भागातून चिनी सैन्याने पूर्णपणे माघार घ्यावी, यासाठी रविवारी मोल्डोमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱयांमध्ये कमांडर स्तरची पाचव्या फेरीची बैठक झाली. मात्र, या बैठकीत ठोस तोडगा निघालेला नाही.









