चिनी कंपन्यांना रोखणार -18 लाख कोटी रुपयांची योजना
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिका सर्वात मोठी मोहीम सुरू करणार आहे. चिनी तंत्रज्ञान आणि त्याचा प्रभाव संपविण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटने व्यापक कायद्यांचे पॅकेज आणले आहे. युएस इनोव्हेशन अँड कॉम्पिटिशन ऍक्ट नावाचे हे विधेयक अनेक सिनेट समित्यांनी मिळून तयार केले आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी या कायद्याला समर्थन व्यक्त केले आहे. अमेरिकन निर्मिती, तंत्रज्ञान संशोधन आणि विकासाकरता 18 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस या कायद्यामुळे मंजुरी मिळणार आहे.
चिनी कंपन्या अनैतिक कार्यांमध्ये गुंतल्या असल्याचा आरोप अमेरिकेचा उद्योगजगत दीर्घकाळापासून करत आहे. हे विधेयक अनैतिक कार्यांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांची यादी प्रकाशित करण्याचा अधिकार प्रदान करते. तसेच अध्यक्ष असे लोक आणि संस्थांवर बंदी घालू शकतात. अमेरिकेत सायबर हल्ल्याला समर्थन केलेल्या किंवा सामील राहिलेल्या विदेशी कंपन्यांवरही या कायद्याच्या माध्यमातून बंदी घालता येणार आहे. अमेरिकेतील फसवणुकीसारख्या मुद्दय़ाला तोंड देण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली जाणार आहे. तसेच चीनमध्ये स्वतंत्र प्रसारमाध्यमांना पाठिंबा देण्यासाठी निधीही पुरविणार आहे.
18 लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या विधेयकाच्या अंतर्गत अमेरिकेत रिजनल टेक्नॉलॉजी हब तयार केले जातील. आधुनिक तंत्रज्ञानाची क्षेत्रे म्हणजेच एआय, रोबोटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी 29 अब्ज डॉलर्सचे बजेट ठेवण्यात आले आहे.
अमेरिका वैज्ञानिक संशोधनावर स्वतःच्या जीडीपीच्या 1 टक्क्यांपेक्षाही कमी खर्च करतो. चीनच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याहून कमी आहे. हे विधेयक संशोधन आाि नवोन्मेषातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार असून अमेरिकेला भविष्यातील उद्योगांमध्ये जगाचे नेतृत्व प्रदान करण्यास मदत करणार असल्याचे उद्गार विधेयकाचे सह-प्रायोजक डेमोक्रेटिक सिनेटर चक शूमर यांनी काढले आहेत.









