ऑनलाईन टीम / बीजिंग :
अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि जगभरातील तरुणांचे आदर्श असलेले उद्योगपती जॅक मा मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत.
ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये एका भाषणात जॅक मा यांनी जिनपिंग सरकारवर जोरदार टीका केली होती. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी पंगा घेणे जॅक मा यांना महागात पडल्याची चर्चा सध्या चीनमध्ये रंगली आहे.
भाषणात जॅक मा यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ म्हटले होते. तसेच चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली होती. व्यवसायात नवीन गोष्टी आणण्याच्या प्रयत्नांना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रणालीत बदल करावा, असेही त्यांनी सरकारला सुनावले होते. त्यामुळे जॅक मा यांची टीका कम्युनिस्ट पक्षाच्या जिव्हारी लागली. यानंतर जॅक मा यांच्या अनेक व्यवसायांवर निर्बंध लादले गेले.









