नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आले तेव्हा भारताच्या स्वामित्वात जेवढी भूमी होती तेव्हढी आजही आहे. चीनने भारताचा कोणताही भूभाग बळकावलेला नाही. भारताच्या भूमीत चीनला प्रवेश करू दिला गेलेला नाही, अशी स्पष्टोक्ती संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे प्रतिपादन केले. विरोधी पक्ष चीनच्या अतिक्रमणाच्या केवळ अफवा पसरवत आहेत, अशी कठोर टीका त्यांनी केली.
सध्याचा चीनशी सुरू असलेला संघर्ष प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच आहे. या रेषेच्या आत चीनला येऊ देण्यात आलेले नाही. भारताची सीमेवरील एकही चौकी चीनच्या ताब्यात गेलेली नाही. भारतीय सेना प्राणपणाने सीमेचे रक्षण करत असून सैनिकांनी दाखविलेले शौर्य अतुलनीय आहे. पण विरोधी पक्ष राजकीय हेतूने सेनेलाही अवमानित करीत असून हे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गलवान येथे दोन्ही सेनांमध्ये संघर्ष झाल्यानंतर मी आपल्या सैनिकांना भेटलो आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. आपल्या सीमा सुरक्षित असून कोणालाही त्या बदलण्याचे धाडस होणार नाही एवढी व्यवस्था करण्यात आली आहे, ही वस्तुस्थिती राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले.
गिलगिट भारताचाच भाग
गिलगिट आणि बाल्टीस्थान या पाकव्याप्त काश्मीरमधील भागांना त्या देशाने अस्थायी राज्यांचा दर्जा दिला आहे. ही पाकची कृती बेकायदेशीर असून हे भाग भारताचेच अभिन्न अंग आहेत. भारताने पाकिस्तानकडे यासंबंधी निषेध नोंदविला आहे. भारताने घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्याने पाकिस्तान निराश झाला असून तो उसने अवसान आणून अशी कृती करतो, अशी टीकाही त्यांनी केली.









