बीजिंग / वृत्तसंस्था
लडाखमध्ये हजारो सैनिक तैनात करणाऱया चीनने आता भारताच्या पूर्व भागात नवीन मोर्चा उघडला आहे. भूतानला लागून असलेल्या डोकलामजवळ एच-6 अणुबॉम्बर आणि क्रूझ क्षेपणास्त्र तैनात केले आहे. या व्यतिरिक्त शियान वाय-20 कार्गो सैन्य विमानदेखील दिसले आहे. चीनने गोलमूड हवाई तळावर ही विध्वंसक शस्त्रे तैनात केली आहेत. हा तळ भारतीय सीमेपासून अवघ्या 1.150 किमी अंतरावर आहे. यापूर्वी चीनने हा प्राणघातक बॉम्बर अक्साई चीनच्या काशगर हवाई तळावर तैनात केला होता. दरम्यान, एलएसीवरील तणावाच्या परिस्थितीत भारत चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे. भारतीय सेना संपूर्ण एलएसीवर सतर्क असून सैन्यबळही वाढविण्यात आले आहे.
लडाखमधील तणावाचा मुद्दा अजूनही चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर भारताचा भर असतानाच चीनने भारताविरोधात नवा डाव रचला आहे. विविध हवाई तळांवर युद्धसामग्री तैनात करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तणावाची परिस्थिती वाढल्यास सज्ज राहण्याच्या हेतूने ही शस्त्रसज्जता केली असल्याचे मानले जात आहे. चीनने गेल्या काही दिवसांपासून डोकलामजवळ सक्रीयता वाढविली आहे. 2017 मध्ये डोकलाममध्येच भारत आणि चीनमध्ये वाद झाला होता. त्यानंतर 73 दिवसांच्या गतिरोधानंतर चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली होती. जून आणि जुलैमध्ये चीनने डोकलामजवळ नवीन बांधकामेही केली आहेत. उत्तर डोकलाममधील टापूंमध्ये ही बांधकामे सुरू आहेत.
चिनी एच -6 बॉम्बर लांब पल्ल्याच्या लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी बनविण्यात आला आहे. हे विमान अणूहल्ला करण्यासही सक्षम आहे. अमेरिकेच्या गुआम तळाला लक्ष्य करण्यासाठी चीनने हे विमान खास करून समाविष्ट केले आहे. यापूर्वीच्या मॉडेलमध्ये क्षेपणास्त्रांची क्षमता मर्यादित होती. परंतु आता सुधारित आवृत्ती तयार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बहुमजली इमारतींची बांधणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन सिंच ला च्या दक्षिण पूर्वेस सुमारे 1 किलोमीटर अंतरावर एक बहुमजली इमारतही बनवित आहे. सिंच ला च्या पश्चिमेकडील शिखरावर जवळजवळ 13 विद्युत खांबदेखील निदर्शनास येत आहेत. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंच ला येथून पश्चिमेकडे एक पायी मार्गही बनवत असल्याचे वृत्त आहे.
भारत-चीनदरम्यान 2017 मध्येही वाद
2017 मध्ये चीनने डोकलामजवळ रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने हस्तक्षेप करत काम रोखले होते. चीन ज्याठिकाणी रस्ता बनवित होता तो भूतानचा प्रदेश होता. भूतानशी झालेल्या करारांतर्गत भारत भूतानच्या परिपूर्णतेचे रक्षण करण्यास मदत करतो. डोकलामचा काही भाग ‘ट्राय जंक्शन’ म्हणून ओळखला जात असून तेथे भारत, चीन आणि भूतानची सीमा आहे. येथे चीनने घुसखोरी केल्यास भारताला धोका संभवू शकतो.









