वृत्तसंस्था /तैपैई :
चीनच्या वाढत्या मनमानीविरोधात ड्रगनचे दोन प्रखर विरोधक तैवान आणि तिबेट एकत्र येताना दिसून येत आहेत. भारताच्या वतीने तिबेटी सैनिकांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिल्यावर ही मैत्री अधिकच दृढ होऊ लागली आहे. तिबेटींचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांनी पुढील वर्षी तैवानचा दौरा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर तैवान अध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी विकास फोर्समध्ये सामील तिबेटी सैनिकाच्या हौतात्म्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दलाई लामा यांनी तैवानच्या एका संघटनेकडून दौऱयाचे निमंत्रण मिळाल्याची माहिती वाइस ऑफ तिबेट या फेसबुक पेजवर दिली आहे. 2021 मध्ये तैवानचा दौरा करू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
दलाई लामा हे जगाचे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळेच त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. दलाई लामांचे तैवानमध्येही मोठय़ा संख्येत समर्थक आहेत. लामांकडून अद्याप आवेदन मिळालेले नाही, असे तैवानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
दलाई लामा यांनी यापूर्वी 1997, 2001 आणि 2009 मध्ये तैवानचा दौरा केला आहे. तर भारताच्या विकास स्पेशल फोर्समधील तिबेटी सैनिक हुतात्मा झाल्यावर तैवानकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. भारताच्या स्पेशल प्रंटियर फोर्समध्ये सामील जवान नयमा तेनजिन यांचे पार्थिव तिबेटी राष्ट्रीय ध्वजात गुंडाळलेला पाहून दुःख होत असल्याचे तैवानने म्हटले आहे.









