ऑनलाईन टीम / लेह :
भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीनने युद्धसरावादरम्यान पूर्व लडाखमधील सीमारेषेजवळ शस्त्रास्त्र डागली. चीनने 90 टक्के नव्याने विकसित केलेल्या अद्ययावत शस्त्रास्त्रांचा वापर या युद्धसरावात केल्याचा दावा चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने केला आहे.
चीनच्या पीएलए सैन्याच्या तिबेट थिएटर कमांडकडून 4700 मीटर उंचीवर हा युद्ध्याभ्यास करण्यात आला. यातील 90% टक्के युद्ध सामग्री आणि शस्त्रास्त्रे ही नवीन असून पहिल्यांदाच कार्यान्वित करण्यात आली आहे. या युद्धसरावाचा एक व्हिडीओही ग्लोबल टाईम्सने जारी केला आहे. भारत-चीन सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या चर्चेत दबाव बनवण्यासाठी हा व्हिडीओ चीनने शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये चिनी सैन्य गाइडेड मिसाईल हल्ल्याचा सराव करताना दिसत आहे. तसेच तोफा आणि खाद्यांवर ठेवून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची प्रात्यक्षिकेही यावेळी करण्यात आली. आपली ड्रोन विमाने, आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे चीन स्वत:ला सुसज्ज बनवत आहे.